
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या पोटावर होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात व्यावसायिक LPG सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका छोट्या हॉटेल व्यावसायिकांपाठोपाठ आता टपरीधारकांनाही बसत आहे. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी बिकट परिस्थिती ओढावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी चहा आणि नाश्ता विक्री करणाऱ्या टपऱ्या आता बंद करण्याची वेळ आली आहे.
रत्नागिरी एसटी बस स्थानकाबाहेरील १० ते १२ छोट्या टपरीधारकांना गेल्या ८ दिवसांपासून सिलेंडर मिळालेला नाही. रत्नागिरीतील व्यावसायिक तुळशीदास कोटकर यांनी व्यवसाय टिकवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. सिलेंडर वाचवण्यासाठी ते बटाटे उकडताना त्याच वाफेवर चहा गरम ठेवत आहेत. तर काही ठिकाणी रॉकेल उपलब्ध नसल्याने चक्क डिझेलवर स्टोव्ह पेटवून चहा आणि मिसळ तयार केली जात आहे. जर येत्या दोन दिवसांत गॅसचा पुरवठा योग्य प्रकारे झाला नाही, तर हे व्यवसाय पूर्णपणे बंद होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील चहा विक्रेत्यांनी गॅसअभावी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे. मात्र, इलेक्ट्रिक शेगडीवर चहा तयार होण्यास जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची गर्दी असूनही सध्या व्यवसायावर परिणाम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सध्या नागपूरच्या रवी भवन या शासकीय निवासस्थानातील कॅन्टीनमध्येही सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रवी भवनात इलेक्ट्रिक शेगडीचा आधार घ्यावा लागत आहे. या ठिकाणी असलेल्या व्हीआयपी पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे.
मुंबईतील बलार्ड पिअर परिसरात अनेक छोट्या व्यावसायिकांनी गॅसऐवजी पुन्हा जुन्या स्टोव्हचा वापर सुरू केला आहे. एकेकाळी गॅसच्या शेगडीवर वेगाने धावणारी अनेक हॉटेल आणि चहाच्या टपऱ्या आता पुन्हा एकदा दशकांपूर्वीच्या स्टोव्ह आणि केरोसीनच्या युगात परतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅसअभावी मुंबईतील कष्टकरी वर्गाला स्वस्त दरात नाश्ता आणि जेवण पुरवणारे हे छोटे व्यावसायिक सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना सेवा देणे कठीण झाले आहे. यामुळे पर्याय म्हणून स्टोव्ह वापरला जात आहे. मात्र त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे.
तसेच नवी मुंबईतील ऐरोली परिसरात तर परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, काही छोटी हॉटेल्स चक्क बंद पडली आहेत. हॉटेल मालकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने कामगारांच्या पगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या भीषण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत शिवसेनेचे युवा नेते आणि नगरसेवक साहिल चौगुले यांनी स्वतः मैदानावर उतरून ऐरोलीतील विविध हॉटेल्सना भेटी दिल्या आणि तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. व्यावसायिकांनी आता खचून न जाता धीर धरावा, तुमची बाजू मी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असून, त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी विशेष बैठक लावली जाईल, असे आश्वासन साहिल चौगुले यांनी दिले.
दरम्यान एकूणच व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलवार आली असून, शासन यावर काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.