अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेवरही महत्त्वाचं बोलले
अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान केलं. यावेळी नाना पटोले यांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन केलं.

दिवंगत नेते अजितदादांच्या अपघाती मृत्यूवरून विरोधकांकडून सातत्याने चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणात रोहित पवारांनी सातत्याने पोलिसांत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही. यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला. माझा भाऊ गेला, परंतु कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. आता अजितदादांच्या मृत्यू प्रकरणावर नाना पटोले यांनी महत्त्वाचं विधान केलं. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांची भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी अजितदादांच्या अपघातावरही भाष्य केलं. ‘अजित पवार मृत्यू प्रकरणात फडणवीस सरकार काहीतरी लपवत आहे. ते अजून स्पष्ट होत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची भूमिका योग्य आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी गुन्हा दाखल का झाला नाही, याविषयी भूमिका मांडली नाही. त्यामुळे काय लपलंय, हे कळण्यासारखे नाही’.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा जीडीपीमध्ये सुधारणा झाल्याचे सांगितले. त्यावर नाना पटोले म्हणाले, ‘सर्व हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुड न्यूज दिली. त्यांनी सर्वांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केलं. तुम्ही त्यांना ट्रोल झालेलं पाहिलं असेल. त्यांच्यावर अर्थतज्ज्ञांनी टीका केली. 7.8 जीडीपी असेल, तर देशात बेरोजगारी नसायला पाहिजे होती. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसायला पाहिजे होत्या. देशात महागाई नव्हती पाहिजे. सर्वात जास्त जीडीपी कोणाची असेल, तर भारताची. तर भारतात आलबेल पाहिजे होते. अशा प्रकारचं खोटं बोललं जात आहे’.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, अजितदादांच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. परंतु सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचा अपघात झाला. परंतु सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. अजित पवार गट सत्तेचा भाग आहे की नाही? त्यांच्या 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एक शब्दही काढलेला नाही, अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.