मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, त्या वक्तव्यामुळे अडचणीत

धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, बंजारा समाजाबाबत बोलताना केलेल्या एका विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, बंजारा समाज आक्रमक झाला आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, त्या वक्तव्यामुळे अडचणीत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2025 | 5:38 PM

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे.  या जीआरनंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार काही ठिकाणी बंजारा समाजाची नोंद ही एसटी प्रवर्गामध्ये आहे.  त्यामुळे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करून आमचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आता बंजारा समाजामधून सुरू आहे. मात्र दुसरीकडे बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध आहे.

दरम्यान आज आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे. बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाची मागणी सुरू आहे. आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील बंजारा समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. मात्र बीडमध्ये  बंजारा समाजाच्या मागणीबाबत बोलत असताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बंजारा समाजानं आक्षेप घेतला आहे.

वंजारा आणि  बंजारा एकच आहे, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं. त्यानंतर  धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावरून बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. वंजारा बंजारा एक नाही. या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा- बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, अशी मागणी करत बंजारा समाजाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे बंजारा आणि वंजारा एक, या आपल्या विधानावरून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

बंजारा समाज आक्रमक 

दरम्यान राज्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर आता बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे, मात्र या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे. त्यामुळे आदिवासी समाज आणि बंजारा समाज आमने-सामने येण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच आता बंजारा आरक्षणाचा मुद्दा देखील उपस्थित झाल्यानं सरकार कसा मार्ग काढणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.