वयाच्या 60 व्या वर्षी आमिर खानने गुपचूप केलं तिसरं लग्न?
अभिनेता आमिर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वाना ओळख करून दिली. किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आमिर गौरीला डेट करतोय. प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर आता आमिर त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. आपल्या 60 व्या वाढदिवशी त्याने प्रेमाची जाहीर कबुली देत गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटला सर्वांसमोर आणलं. त्यानंतर या दोघांना विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या नात्याविषयी आणि लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. सध्या आमिर आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून दोघांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती आहे. हे दोघं गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि गेल्या अडीच वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. गौरी ही बेंगळुरूची असून तिथे तिचं सलॉन आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, “गौरी आणि मी या नात्याबद्दल खूप गंभीर आहोत. आम्ही एकमेकांशी कमिटेड आहोत. आम्ही पार्टनर आहोत आणि चांगल्या-वाईट परिस्थितीत आम्ही एकमेकांसोबत आहोत. खरं सांगायचं झालं तर माझ्या मनात मी गौरीशी लग्नसुद्धा केलंय. पुढे जाऊन आम्ही कायदेशीररित्या लग्न करू किंवा नाही, पण हे मात्र सत्य आहे. याबाबत मी भविष्यात काय ते निर्णय घेईन.” आमिर खानच्या या वक्तव्यामुळे तो आणि गौरी त्यांच्या नात्याबद्दल खूपच गंभीर असून ते लग्नाचाही विचार करत असल्याचं स्पष्ट होत आहे. “आम्ही अनपेक्षितपणे एकमेकांना भेटलो होतो. त्यानंतर एकमेकांच्या संपर्कात राहिलो आणि पुढे आपोआप सर्व घडत गेलं”, असं आमिरने गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं होतं. गौरीला सहा वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे.
आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. 2002 मध्ये रीना आणि आमिर यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने 2005 मध्ये किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. 2021 मध्ये या दोघांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. घटस्फोटानंतरही आमिरचं त्याच्या दोन्ही पत्नींसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. रीना आणि किरण या दोघांसोबत आमिरचं मैत्रीपूर्ण नातं कायम आहे.
कोण आहे गौरी स्प्रॅट?
लिंक्ड इन प्रोफाइवरील माहितीनुसार, गौरीने ब्लू माऊंटन स्कूलमधून शिक्षण घेतलंय. त्यानंतर तिने लंडनमध्ये एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफी फॅशनचा कोर्स केला. तिचं मुंबईतही ‘बी ब्लंट’ नावाने सलॉन आहे. गौरीला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे. आमिर आणि गौरीच्या वयात बरंच अंतर आहे. आमिर 60 वर्षांचा असून गौरी सध्या 46 वर्षांची आहे. म्हणजेच या दोघांमध्ये जवळपास 14 वर्षांचं आहे.
