Omicron| नाशिकमध्ये 45 टक्के नागरिकांची लसीकरणाकडे पाठ, प्रशासनाचे धाबे दणाणले

सध्या कोरोनाच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron)  विषाणूचा धोका वाढला आहे. मात्र, अजूनही नाशिक शहरातील 45 टक्के नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे समोर येत आहे.

Omicron| नाशिकमध्ये 45 टक्के नागरिकांची लसीकरणाकडे पाठ, प्रशासनाचे धाबे दणाणले
corona vaccination

नाशिकः सध्या कोरोनाच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron)  विषाणूचा धोका वाढला आहे. विदेशात धडाधड निर्बंध लादण्यात येत आहेत. काल-परवापर्यंत आफ्रिकेत असलेला हा विषाणू थेट महाराष्ट्रात येऊन ठेपलाय. मात्र, अजूनही नाशिक शहरातील 45 टक्के नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे समोर येत आहे. तब्बल पावणेदोन लाख जणांनी लसीच्या दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.

11 महिने झाले…

नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहेत. त्यात 18 वर्षांवरील 13 लाख 63 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11 लाख 87 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेही नाहीत. ही चिंतेची गोष्ट असून, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शिवाय एक लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. 7 लाख 48 नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत.

एका रुग्णाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सध्या 436 कोरोना रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. त्यात अजून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांत काल 34 ने वाढ झाली आहे. त्यात महापालिका हद्दीत 15 आणि नाशिक ग्रामीणमध्ये 18 रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या निफाडमधील 74, सिन्नरमध्ये 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 545 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आज एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

लस हाच पर्याय

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीचे दोन्ही डोस आवश्य घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. कारण तूर्तास तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस आणि मास्क हेच दोन पर्याय आहेत.

इतर बातम्याः

Nashik| पोलीस आयुक्त हेडमास्टरांच्या भूमिकेत, विनाहेल्मेट चालकांची 10 गुणांची परीक्षा; पेपर सोडवताना नाकी नऊ

Nashik| सारा मायेचा खेळ…कालसर्प पूजा करण्यावरून दोन पुजारी कुटुंबात राडा; गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते काढले

OBC Reservation| नाशिक महापालिकेत 133 पैकी 104 जागा होणार खुल्या; 29 जागा अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI