ऐन निवडणुकीत अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचार देखील रंगात आला आहे, मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

ऐन निवडणुकीत अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 5:58 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करतानाच तुमच्याकडे मत आहे, तर माझ्याकडे निधी आहे, असं थेट अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली असून, विरोधकांकडून अजित पवार यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू झाला आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

बारामती तालुक्यातील मालेगाव नगर पंचायत निवडणुकीमध्ये पक्षाचा प्रचार करताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जर तुम्ही पक्षाचे सर्व उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला शब्द देतो, शहराला निधीची कमतरता भासू देणार नाही. जर तुमच्याकडे मत आहे तर माझ्याकडे निधी आहे. जर तुम्ही आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार विजयी केले तर मी सर्व आश्वासनं पूर्ण करेल. पण जर निवडून आले नाहीत तर मी पण विचार करेन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

विरोधकांकडून अजितदादांची कोंडी

दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारला जो पैसा मिळतो तो जनतेच्या टॅक्समधून मिळतो, हा पैसा अजित पवार यांच्या घरातून येत नाही. अजित पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे मतदारांना धमकावण्याचा प्रकार आहे, हे लोकशाही विरोधात आहे, निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार? असा थेट सवालच दानवे यांनी यावर उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगानं यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर निवडणूक आयोग या वक्तव्याची दखल घेणार का? काय कारवाई करणार हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे,  जर या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून दखल घेतली गेली तर ऐन निवडणुकीत अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.