‘CBI’च्या नावाखाली 71 लाखांचा डल्ला! पत्नीच्या सतर्कतेने मोठा सायबर फ्रॉड उघड”
सायबर भामट्यांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता देखील सीबीआयच्या नावाखाली भामट्यांनी एका इसमाला चक्क 71 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. प्रकरण नेमकं काय आहे घ्या जाणून

डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सायबर भामट्यांनी आता थेट सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून सामान्य नागरिकांना लुटण्याचे सत्र सुरू केले आहे. डोंबिवलीतील एका इसमाला चक्क 71 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘कोर्ट केस’ची भीती दाखवून ही लूट करण्यात आली, मात्र या संपूर्ण प्रकरणात एका महिलेच्या सतर्कतेने मोठे सत्य बाहेर आणले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
डोंबिवलीमध्ये सायबर फसवणुकीचे एक मोठे आणि खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी करत दोन भामट्यांनी डोंबिवलीतील महेश आगरकर यांना 71 लाख रुपयांना लुटले आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात संदीप कुमार राव आणि करण शर्मा या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महेश आगरकर यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (TRAI) अधिकारी असल्याचे सांगितले. आगरकर यांच्या मोबाईलवरून महिलांना आक्षेपार्ह मेसेज पाठवले गेल्याचा बनाव त्याने रचला आणि घाटकोपर पोलिसांत तक्रार असल्याचे भासवले. त्यानंतर, “या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे,” असे सांगून त्यांना मानसिक दबावाखाली आणले.
काही वेळातच संदीप कुमार राव आणि करण शर्मा यांनी आगरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आगरकर यांच्या बँक खात्यात अनियमितता असल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची धमकी दिली. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आदेशही त्यांना पाठवले. खटला टाळण्यासाठी आणि तपास पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील असे आश्वासन देऊन, आरोपींनी आगरकर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 71 लाख रुपये उकळले.
पत्नीच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश:
इतकी मोठी रक्कम दिल्यानंतर आगरकर यांना संशय आला आणि त्यांनी सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. आगरकर यांच्या पत्नीने तातडीने आरोपींना काही प्रश्न विचारले, मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. संशय बळावल्याने त्यांनी आरोपींनी पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, ती सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आगरकर यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास होमाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी आरोपींच्या तपासासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. आरोपींच्या बँक व्यवहारांची कसून चौकशी केली जात असून, नागरिकांनी अशा कोणत्याही निनावी फोनला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.