
राज्यात यावर्षी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे, देशातील अनेक राज्यांना पावसाचा प्रचंड मोठा फटका बसला, महाराष्ट्रात देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं, दरम्यान पाऊस गेला असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार मलेशियाच्या आसपास तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, याचं हळुहळु चक्रीवादळात रुपातंर होत आहे, हे चक्रीवदाळ आता बंगालच्या उपसागराकडे सरकत असून, पुढील एक ते दोन दिवस देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका हा दक्षिणेकडील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून पुढील चार दिवस 29 नोव्हेंबरपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अंदमान, निकोबार बेटासह तामिळनाडू, ओडिशा आणि आध्रप्रदेशात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील 72 तास हे दक्षिणेकडील राज्यांसाठी धोक्याचे असणार आहेत. या काळात ताशी 65 ते 100 किमी एवढ्या प्रचंड वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान तामिळनाडू, अंदनमान, निकोबार बेटं, आंध्रप्रदेश या राज्यांसह बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडका आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये देखील तापमानात घट झाली आहे, तर महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा इशारा देण्यात आला आहे. या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, या पावसामुळे आधीच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा अवकाळीचं मोठं संकट घोंगावत आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.