20 कोटींची ऑफर, धनंजय मुंडेंना गुंतवण्याची भाषा अन् सुरेश धस…; दादा गरुडचा नवा Video समोर

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्या कटातील आरोपी दादा गरुडचा नवा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात बीडमधील राजकीय खळबळ वाढली आहे. जरांगे पाटील यांच्यासाठी अडीच कोटींची सुपारी, लोकसभेसाठी २५ कोटींची ऑफर आणि संतोष देशमुखांच्या बंधूंना २० कोटींची ऑफर अशा गंभीर दाव्यांनी अनेक नेत्यांची नावे जोडली गेली आहेत. पोलीस या व्हिडिओ आणि दाव्यांची कसून चौकशी करत आहेत.

20 कोटींची ऑफर, धनंजय मुंडेंना गुंतवण्याची भाषा अन् सुरेश धस...; दादा गरुडचा नवा Video समोर
Dada Garud Dhananjay Munde
| Updated on: Nov 10, 2025 | 9:03 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या गंभीर प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी विवेक उर्फ दादा गरुड याचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. या नव्या व्हिडीओमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. या नव्या व्हिडीओत बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नवा दावा करण्यात आला आहे.

लोकसभेसाठी २५ कोटी रुपयांची ऑफर

यापूर्वी दादा गरूडचे दोन व्हिडीओ समोर आले होते. ज्यात जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा आणि गंगाधर काळकुटे यांना लोकसभेसाठी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला होता. आता या तिसऱ्या व्हिडीओत आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दादा गरूडने असा दावा केला आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. हा दावा करताना त्याने धनंजय मुंडे आणि सुशील कराड यांचा उल्लेख केला आहे.

दादा गरूडच्या म्हणण्यानुसार, ही ऑफर शासकीय बॉडीगार्ड संतोष जाधव याच्यासमोर दिली गेोली होती. यानंतर आमदार सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांना बोलवून, आपण धनंजय मुंडे यांना गुंतवून टाकू, असे म्हटले होते. मात्र, धनंजय देशमुख यांनी हे माझ्या तत्त्वात बसत नाही असे म्हणत या प्रस्तावांना नकार दिला, असा दावा व्हिडीओत करण्यात आला आहे.

कसून तपास सुरु

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी विवेक उर्फ दादा गरूड आणि अमोल खुणे या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघडकीस येत आहेत. सध्या समोर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अडीच कोटींची सुपारी, गंगाधर काळकुटेंना २५ कोटींची ऑफर आणि धनंजय देशमुखांना २० कोटींची ऑफर या तीन दाव्यांमुळे बीड जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची नावे जोडली जात आहे. पोलिसांनी या व्हिडीओंची सत्यता आणि त्यामागील सूत्रधार कोण आहेत, याचा कसून तपास सुरू केला आहे.

दरम्यान आरोपी दादा गरूडचे दावे राजकीय कटकारस्थान, आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने, पोलीस या व्हिडिओमधील माहितीची पडताळणी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.