राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय फक्त एकच व्यक्ती घेणार! मंत्र्याने स्पष्टच सांगितलं, आतली बातमी समोर
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल, असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांना जवळून काम करताना पाहिलं असून त्या खंबीरपणे जबाबदारी सांभाळत आहेत, असंही ते म्हणाले. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रिपदात बदल होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.

विठ्ठल देशमुख वाशिम, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण हा मुद्दा राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत राहतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. आता त्यासोबतच शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहे. पण आता विलिनीकरणावर मोठ्या नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय सुनेत्रा पवार पुण्याच्या पालकमंत्री म्हणून काम करण्यास सक्षम असून पालकमंत्री बदलण्याचा विषयच नसल्याचंही भरणे म्हणाले.
माझं मत असण्यापेक्षा आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत. आमचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आहेत. शेवटी सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. शरद पवार दाऊद इब्राहिम संबंध या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही लहान असतांना पासून पवार साहेबांवर असे खूप आरोप झालेले आहेत. मात्र पवार साहेबांच्या बाबतीत असे कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा वहिनी चांगलं काम करत आहेत जिल्ह्यात सर्वांना एकत्र घेऊन काम करत आहेत. सुनेत्रा वहिनी ह्या दादांच्या पत्नी आहेत त्यांनी दादांना काम करताना जवळून पाहिला आहे. त्या खंबीर आहेत आणि चांगलं काम करत आहेत, पालकमंत्री हा विषय नाही. हे कुणीतरी सोडलेला विषय दिसतोय.
रोहित पवारांना दिलं उत्तर
सुनेत्रा वहिनी ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना दोन नंबरचं खातं आहे. सुनेत्रा वहिनींनीचं सर्वांना आम्हाला ताकद दिली पाहिजे. शेतकऱ्यांना ताकद दिली पाहिजे. कोण काय म्हणते याबद्दल मला बोलायचं नाही. सुनेत्रा वहिनी ह्या काम करायला भक्कम आहेत. सुनेत्रा वहिनी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम करायला समर्थ आहेत. महायुतीच्या सर्व घटकांना घेऊन काम करतात. पालकमंत्री बदलण्याचा विषयच नाही.