
Eknath Shinde Call For Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडलेली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वी खुद्द राऊत यांनीच सोशल मीडियाद्वारे सांगितली होती. राऊत आजारी आहेत हे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देश आणि राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा दिल्या. असे असतानाच आता उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राऊतांचे भाऊ तथा आमदार सुनील राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे सुनिल राऊत यांच्याशी फोनवरून संभाषण करत असल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षाची दोन शकलं पडली. अनेक मंत्री, आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. संजय राऊत आणि सुनील राऊत हे मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. या बंडानंतर संजय राऊत यांनी अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीक केलेली आहे. जाहीर सभेत, भाषणात, पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनीही राऊत यांच्यावर अनेकवेळा बोचरी आणि खोचक टीका केलेली आहे. म्हणूनच शिंदे आणि संजय राऊत हे तसे मोठे राजकीय मतभेद असलेले नेते आहेत. परंतु संजय राऊतांची प्रकृती बरी नसल्याने हे सर्व मतभेद विसरून एकनाथ शिंदे यांनी सुनिल राऊत यांच्याकडे संजय राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकणाचेच हे एक उदाहरण असल्याची भावना यामुळे व्यक्त होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांच्याकडे संजय राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. संजय राऊत हॉस्पिटलमधून घरी आले का?असे एकनाथ शिंदे विचारताना दिसत आहेत. तसेच त्यांना सांगा की लवकर बरे व्हा, असा निरोपही एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांच्याकडे दिला आहे. काही दिवसांआधी संजय राऊतांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी मी तुमच्या भेटीला येईल, असे राऊतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. उपचार चालू असतानाच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना भांडूपच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.