हिंदी सक्तीबाबत अजित पवारांची मोठी भूमिका, म्हणाले पहिलीपासून…
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. सरकारच्या या भूमिकेला मात्र मोठा विरोध होत आहे.

Ajit Pawar : गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी विषयाच्या सक्तीला विरोध केला जात आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषयाच्या समावेशाच आग्रह का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहीही झालं तरी हिंदी सक्ती होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांतील नेत्यांनी घेतली आहे. असे असतानाच आता राज्य सरकार हिंदी विषयाबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मोठी आणि महत्त्वाची भूमिका घेतली जात आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदीसक्ती नको, असं अजित पवार यांनी म्हटलंय. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी- अजित पवार
“कुठली भाषा शिकू नये या मताचे कोणीही नाही. परंतु पहिल्याच वर्गात विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचं ओझं लादणं हे योग्य नाही. पहिलीपासून विद्यार्थी जेव्हा मराठी लिहायला आणि वाचायला शिकतो तेव्हापासून त्या विद्यार्थ्याली हिंदी लिहिता आणि वाचते येते. पण बोलण्यासंदर्भात पाचवीपासून शिक्षण दिले तरी हरकत नाही. पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी,’ असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचेही तसेच मत आहे, अशी पुष्टीही अजित पवार यांनी जोडली.
सात दिवसांत सोक्षमोक्ष लावणार?
हिंदी सक्तीबाबतचा अंतिम निर्णय आगामी सात दिवसांत घेण्यात येण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री हिंदी विषयाच्या समावेशाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष, नेते, संघटना, भाषातज्ज्ञ यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सादरीकरण करून संबंधितांची भूमिका जाणून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार? इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीचा विषय मागे पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हिंदी सक्तीवर शरद पवारांची भूमिका काय?
दरम्यान, खासदार शरद पवार यांनीदेखील अनौपचारिक गप्पांत हिंदी सक्तीवर मत मांडलं आहे. हिंदी भाषेला कमी समजणं अयोग्य आहे. पण ही भाषा पहिली ते चौथीपर्यंत सक्तीची करणं हे योग्य नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी केली आहे.
