
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, यामध्ये एनडीएला मोठं यश मिळालं आहे. भाजप हा या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला, तर दुसऱ्या क्रमाकांवर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाआघाडीचा मात्र मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसला मोठं अपयश आलं आहे. दरम्यान या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात काँग्रेसबद्दल समिश्र चर्चा सुरू आहे, यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे. ती काँग्रेस पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचणार आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
असं कधी होत नाही. याच्या आधी महाराष्ट्राचा विचार केला तर 1957 साली महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला होता, लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला निवडून आणलं. त्यावेळी काँग्रेस संपली असं वाटलं. पण असे पक्ष संपत नसतात, तो विचार असतो. मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे. ती काँग्रेस पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचणार आहे, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला. मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्रात असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकले होते, पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिला वर्गाला 10 हजार देणे हे आम्ही कधी ऐकले नव्हते. याचे काही परिणाम आहेत की नाही हे लोकांनी ठरवावे, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.