साहित्य संमेलनात ‘ळ’ वर्णाबद्दल केंद्र सरकारला सूचना; नाशिकमध्ये बाबूराव बागूल, वामनदादा कर्डकांचे उचित स्मारक उभारण्याची मागणी

साहित्य संमेलनातील ठराव आणि सूचनांवर केंद्र सरकार, राज्य सरकार, साहित्य महामंडळ आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काय भूमिका घेतात हे येणारा काळच सांगेल. जाणून घेऊयात हे ठराव नेमके कोणते आणि काय आहेत.

साहित्य संमेलनात 'ळ' वर्णाबद्दल केंद्र सरकारला सूचना; नाशिकमध्ये बाबूराव बागूल, वामनदादा कर्डकांचे उचित स्मारक उभारण्याची मागणी
साहित्य संमेलनात कौतिकराव ठाले-पाटील यांनी ठरावांचे वाचन केले.

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नाशिकमध्ये सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात रविवारी एकूण 13 ठराव मांडण्यात आले. त्यात ‘ळ’ वर्णाबद्दल केंद्र सरकारला सूचना दिल्या आणि नाशिकमध्ये साहित्यिक बाबूराव बागूल, वामनदादा कर्डक यांचे स्मारक उभारण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. हे ठराव आणि सूचनांवर केंद्र सरकार, राज्य सरकार, साहित्य महामंडळ आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काय भूमिका घेतात हे येणारा काळच सांगेल. जाणून घेऊयात हे ठराव नेमके कोणते आणि काय आहेत.

ठराव क्रमांक 1

साहित्य, कला, संस्कृती, समाजकारण या क्षेत्रांत लक्षणीय कार्य केलेल्या खालील व्यक्तींचे दु:खद निधन झाले. त्यांना आणि कोरोनाच्या महामारीने निधन झालेल्या सर्व व्यक्तींना या संमेलनात श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यात शंकर सारडा, इलाही जमादार, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, सुमित्रा भावे, राजीव सातव, सुंदरलाल बहुगुणा, अनंत मनोहर, गणपतराव देशमुख, गोपाळराव मयेकर, विनायक नाईक, सतीश काळसेकर, जयंत पवार, लीला सत्यनारायण, कमला भसीन, डॉ. गेल ऑमव्हेट, बाबासाहेब पुरंदरे, सुलोचना महानोर, दिलीपकुमार, विनायक दादा पाटील, डॉ. सुनंदा गोसावी, चंद्रकांत महामिने, आ. चंद्रकांत जाधव, बनाबाई ठाले पाटील आणि इतर ज्ञात, अज्ञात अशा सर्व व्यक्ती.

ठराव क्रमांक 2

गेली काही वर्षे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची गंभीर दुरवस्था झाली आहे. शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येकडे वळत असल्याचे चित्र बघायला मिळते. त्यांना घर चालवणे, मुलांचे शिक्षण, मोठे आजारपण अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे. केंद्र व राज्य शासनाने या बळीराजाला सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी, अशी कळकळीची विनंती ह्या संमेलनाच्या माध्यमातून करीत आहोत. त्याबरोबरच आम्ही सर्व साहित्यप्रेमी शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या भविष्यासाठी सातत्याने सक्रीय राहू असे आश्वासन हे साहित्य संमेलन शेतकऱ्यांना देत आहे. या ठरावाचे सूचक हेमंत टकले होते, तर अनुमोदक डॉ. गजानन नारे.

ठराव क्रमांक 3

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. केंद्र सरकारकडे खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला आणि मराठी भाषकांसाठी आस्थेचा असलेला हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावा. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा अशी आग्रही मागणी हे संमेलन भारत शासनाकडे करीत आहे. या ठरावाचे सूचक प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील होते, तर अनुमोदक विलास मानेकर.

ठराव क्रमांक 4

अलीकडच्या काळात मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. मराठी भाषेच्या व मराठी भाषक समाजाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. मात्र, या शाळा बंद पडू नयेत म्हणून प्रयत्न करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका उदासीन दिसते. शासनाने ही उदासीनता झटकून राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणार नाहीत, यासाठी तातडीने कृतिकार्यक्रम आखावेत, तसेच मराठी शाळांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील व बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना, तसेच महाविद्यालयांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी हे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र सरकारकडे करीत आहे. या ठरावाचे सूचक विश्वास ठाकूर होते, तर अनुमोदक प्रकाश पायगुडे.

ठराव क्रमांक 5

कर्नाटक सरकार मराठी भाषेकडे सतत अन्यायाच्या दृष्टीने पाहत आहे. त्यामुळ तेथील मराठी भाषेची गळचेपी वरचेवर वाढत चालली आहे. आता तर शासन पातळीतीवरील परिपत्रके मराठी भाषेतून देणे बंद केले आहे. तेथील सभा-संमेलनात मराठी भाषकांवर बंधने लादली जात आहेत. त्यांच्या ह्या धोरणाचा आणि निर्णयाचा हे संमेलन तीव्र निषेध करीत आहे. या ठरावाचे सूचक भगवान हिरे होते, तर अनुमोदक किरण समेळ.

ठराव क्रमांक 6

महाराष्ट्राबाहेर फार मोठ्या प्रमाणात मराठी भाषक वास्तव्य करतो. या समाजाचे भाषाविषयक प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गतीने पावले उचलणे गरजेचे आहे. राज्यशासनाने मराठी भाषा विभागात बृहन्महाराष्ट्रासाठी स्वतंत्र मराठी अधिकारी नेमला ही स्वागतार्ह बाब असली, तरी यापुढे बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करण्यात यावा अशी मागणी 94 वे अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन करीत आहे. या ठरावाचे सूचक प्रदीप दाते होते, तर अनुमोदक सुभाष पाटील.

ठराव क्रमांक 7

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राची व महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी भारताच्या निरनिराळ्या राज्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी ‘महाराष्ट्र परिचय केंद्रे’ स्थापन केली होती. आता ही परिचय केंद्रे असून नसल्यागत झाली आहेत. म्हणून गोव्यात पणजी येथे अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे आणि परिचय केंद्र नसलेल्या सर्व राज्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी लवकरात लवकर महाराष्ट्र परिचय केंद्रे स्थापन करावीत. आणि तेथे मराठी व्यक्तींचीच अधिकारी व कर्मचारी म्हणून नेमणूक करावी अशी आग्रहाची मागणी हे संमेलन करीत आहे. या ठरावाचे सूचक डॉ. रामचंद्र काळुंखे होते, तर अनुमोदक गजानन नारे.

ठराव क्रमांक 8

महाराष्ट्रात साठहून अधिक बोलीभाषा आहेत, त्यातील काही बोली नामशेष होत आहेत. बोली भाषांना उत्तेजन देऊन त्यांचे संवर्धन कसे करता येईल. यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती नेमावी अशी मागणी हे 94 वे साहित्य संमेलन करीत आहे. या ठरावाचे सूचक डॉ. दादा गोरे होते, तर अनुमोदक प्रा. प्रतिभा सराफ.

ठराव क्रमांक 9

राजभाषा हिंदीच्या वर्णमालेत मराठी भाषेतील विशेष वर्ण ‘ळ’ ची तरतूद पुनरुज्जीवित करण्यासाठी दूरसंचार खात्यातील एक कर्मचारी प्रकाश निर्मळ यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल हे साहित्य संमेलन त्यांचे अभिनंदन करीत आहे. या ठरावाचे सूचक होते विठ्ठल गावस आणि अनुमोदक होते कपूर वासनिक.

ठराव क्रमांक 10

भारत सरकारच्या सर्व कार्यालयांत ‘ळ’ या वर्णाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश भारत सरकारने द्यावेत. तसेच ‘ळ’ या वर्णाऐवजी इतर कोणताही वर्ण वापरू नये, अशी आग्रहाची सूचना हे संमेलन भारत सरकारकडे करीत आहे. या ठरावाचे सूचक होते प्रा. मलिंद जोशी आणि अनुमोदक होते डॉ. विलास साळुंखे.

ठराव क्रमांक 11

सार्वजनिक ग्रंथालये टिकली आणि वाढली पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सक्रिय पावले उचलण्याची गरज आहे. या ग्रंथालयांतील कर्मचार्‍यांना किमान जगण्याइतके वेतन देणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रंथालय संघाच्या या मागणीला हे साहित्य संमेलन जाहीर पाठिंबा देत आहे. तसेच, सार्वजनिक ग्रंथालयांसाठी पुस्तके खरेदी करताना त्यांचा दर्जा राखला जात नाही. तो राखला जावा, अशी अपेक्षा ग्रंथालयांच्या चालकांकडून हे साहित्य संमेलन करीत आहे. या ठरावाचे सूचक होते, प्राचार्य तानसेन जगताप, तर अनुमोदक होते नरेंद्र पाठक.

ठराव क्रमांक 12

न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या निफाड येथील स्मारकाचे अपूर्ण असलेले काम राज्य शासनाने लक्ष घालून त्वरित पूर्ण करावे. तसेच नाशिक येथे साहित्यिक बाबुराव बागूल आणि वामनदादा कर्डक यांचे उचित असे स्मारक व्हावे, अशीही मागणी हे 94 वे साहित्य संमेलन करीत आहे. या ठरावाचे सूचक होते समीर भुजबळ, तर अनुमोदक डॉ. शंकर बोऱ्हाडे.

ठराव क्रमांक 13

देशाच्या प्रागतिक वाटचालीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे हे मोलाचे कार्य, लेखन आणि त्यांचे एकंदर विचार उजेडात आणण्याचे आणि ते प्रकाशित करण्याचे मौलिक कार्य औरंगाबादचे अभ्यासक बाबा भांड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आणि अजूनही करीत आहेत. त्याबद्दल हे साहित्य संमेलन त्यांचे अभिनंदन करीत आहे. या ठरावाचे सूचक होते प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि अनुमोदक होते पुरुषोत्तम सप्रे.

इतर बातम्याः

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!

87 वर्षांचा तरुण, काळजात लोकशाहीचे धगधगते स्पिरीट, ओठात कैसे ढूंढना पाऊ…साहित्य संमेलनात भटकळांची मोहनमाया!

Published On - 10:12 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI