अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तिर्थस्थळ म्हणून विकास, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले अनेक निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चौंडी, अहिल्यानगर येथे कॅबिनेट बैठक घेत अनेक शासकीय निर्णय जाहीर केले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी राज्यसरकारने आज अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी चौंडी येथे कॅबिनेट बैठक घेत अनेक निर्णय जाहीर केले. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तिर्थस्थळ म्हणून विकास करण्यात येणार असून अहिल्यादेवी त्रिशताब्दी निमित्त एका लोगोचे प्रकाशन केलेआहे. तसेच अहिल्यादेवी त्रिशताब्दी निमित्त एका डाक तिकीटाचेही प्रकाशन केले आहे. तसेच अहिल्यादेवी यांचे एक प्रेरणा गीत देखील जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी निमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी येथे कॅबिनेट बैठक घेण्याचे ठरवले होते त्यानुसार ही बैठक झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीत अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तिर्थस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तुळजाभवानी मंदिराचा १८६५ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. तसेच ज्योतिबा मंदिरासाठी २५९ कोटी, महालक्ष्मी मंदिरासाठी १४४५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कुंभमेळासाठी विशेष प्राधिकरण कायदा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा होणार आहे यासाठी विशेष प्राधिकरण कायदा मंजूर केला आहे. चौडीत अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी (अंदाजे ₹८०.९० कोटी) आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यमार्ग४०५ (चौंडी) ते निमगांव डाकू रस्त्याच्या (अंदाजे ₹३९४.०४ कोटी) कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्मृतीस्थळाचे पुनरुज्जीवन
चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृतीस्थळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. विविध प्रकारची कामं यात होणार आहेत. अखिल भारतीय स्तराचे प्रेरणा आणि तीर्थस्थळ तयार झाले पाहिजे अशी योजना आकारास आली आहे. अष्टविनायक मंदिरासाठी १४७ कोटी रुपये, तुळजापूर मंदिरासाठी १६५ कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी २७५ कोटी रुपये, माहूर गड विकास आराखडा ८२९ कोटी रुपये अशा एकूण ५ हजार ५२० कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता दिली आहे.
घाट- तलाव – विहीरींचे पुनरुज्जीवन
सर्व विभाग स्तरावर धनगर समाजाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनीसाठी हॉस्टेलची निर्मिती, अहिल्यादेवींच्या जलसंवर्धन आणि घाट विहीरी पाणी वाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. तलावाचे पुनरुज्जीन करणे, १९ विहीरी, ३४ जलाशय, राहुरीत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरची निर्मिती असे निर्णय यावेळी घेण्यात आले आहेत.