आशियातल्या सर्वात मोठ्या बकरा मंडीत आतापर्यंत किती बकऱ्यांची विक्री? किती कोटींची उलाढाल? आकडेवारी समोर

बकरी ईद निमित्त मुंबईच्या देवनार बकरा मंडीत १ लाख ४५ हजारांहून अधिक बकरे दाखल झाले असून खरेदीदारांची प्रचंड गर्दी झाली आहे. तर नालासोपाऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत ईद साजरी होत आहे.

आशियातल्या सर्वात मोठ्या बकरा मंडीत आतापर्यंत किती बकऱ्यांची विक्री? किती कोटींची उलाढाल? आकडेवारी समोर
mumbai bakra mandi
| Updated on: May 28, 2026 | 9:49 AM

आज राज्यभरात बकरी ईदचा सण साजरा होत आहे. एकीकडे मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन प्रचंड वाद निर्माण झाला असताना दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आशियातील सर्वात मोठी बकरा मंडी असलेल्या देवनार परिसरात खरेदी-विक्रीला प्रचंड वेग आला आहे. रविवारी १७ मेपासून सुरू झालेल्या या विशेष बाजारात आता अंतिम टप्प्यात गर्दीने आपला उच्चांक गाठला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून हजारो मुस्लिम बांधव येथे खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा बाजारात बकऱ्यांपेक्षा खरेदीदारांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

१ लाख ४५ हजार बकरे दाखल; ७५ हजारांहून अधिक विक्री

देवनार मंडीच्या अधिकृत लाईव्ह काउंटिंग बोर्डनुसार, आतापर्यंत या बाजारात १ लाख ४५ हजारांहून अधिक बकरे दाखल झाले आहेत. यापैकी ७५,५०० पेक्षा अधिक बकऱ्यांची विक्री पूर्ण झाली आहे. तर साधारण ७० हजार बकरे अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या बाजारात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा विविध राज्यांतून व्यापारी बकरा विक्रीसाठी आले आहेत.

सध्या मुंबईत कडक ऊन पडलं आहे. या उन्हाचा सामना करत व्यापारी तंबूंमध्ये राहून विक्रीसाठी धावपळ करताना दिसत आहेत. यंदा बाजारात सर्वसाधारणपणे २५ हजार ते ४० हजार रुपयांदरम्यान बकऱ्यांचे दर आहेत. यंदाच्या देवनार मंडीत उत्तर प्रदेशच्या गोंडामधून आलेल्या एका व्हीआयपी बकऱ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा राजेशाही थाट आणि किंमत पाहण्यासाठी खरेदीदार गर्दी करत आहेत.

याशिवाय, बाजारात आलेल्या इतरही अनेक प्रीमियम आणि वैशिष्ट्यपूर्ण बकऱ्यांचे व्हिडीओ आणि त्यांच्या किमती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दुपारच्या कडक उन्हामुळे संध्याकाळच्या वेळेत मंडीत प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे खरेदीदारांची झुंबड उडत आहे.

या मंडीतील अफाट गर्दी लक्षात घेता चोरी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी देवनार पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. संपूर्ण मंडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष पोलीस नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला आहे.

नालासोपाऱ्यात कडेकोट बंदोबस्त

दरम्यान, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात बकरी ईद अतिशय शांततेत आणि उत्साहात साजरी होत आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या मीरारोड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यातील पोलीस प्रशासन आणि मुस्लिम बांधवांनी कमालीची सतर्कता बाळगली आहे. नालासोपारा, आचोला, स्टेशन परिसर, सोपारा गाव आणि स्थानिक मशिदींच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. कोणताही अनुचित प्रकार न घडता, सर्वधर्मीयांनी अतिशय सलोखा आणि भाईचारा दाखवत हा सण साजरा केल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Follow Us