विलास घुले हत्या प्रकरण तापणार, धनंजय मुंडे यांचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा, पोलिसांवरही संतापले
विलास घुले हत्याप्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. आज आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबाची भेट घेतली. दोन गटातील भांडण सोडवत असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता, त्यातच विलास घुले यांचा मृत्यू झाला.

दोन गटात सुरू असलेलं भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांचीच हत्या करण्यात आली. विलास घुले यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आज माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबाची भेट घेतली, यावरून त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणात 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र एका आरोपीला का अटक केली नाही? तो पोलिसांचा लाडका आहे का? असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले मुंडे?
या प्रकरणात 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र एका आरोपीला का अटक केली नाही? तो पोलिसांचा लाडका आहे का? या संपूर्ण केसमधून एका आरोपीला सोडायचं आहे का? 302 च्या आरोपीला त्यासाठी बाहेर ठेवलय का? असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी पोलिसांना केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आमची वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, विषय गुन्हागारी प्रवृत्तीचा आहे, 9 जणांना अटक केली तर दहावा आरोपी का बाहेर आहे? आमचा पोलिसांवर आरोप आहे की, त्यांना एका आरोपीला वाचवायचं आहे. आम्ही देखील आता या आरोपीच्या अटकेसाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी मुंडे यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 22 हत्या झाल्या हे बीड जिल्ह्याचं दुर्दैवं आहे. एसपी सोडले तर कोणत्याही पोलिसाला आपलं नाव लावण्याचा अधिकार नाही. एसटी समाजाचा एक गरीब मुलगा कुणाचा वैरी कसा होऊ शकतो? कोणी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही घुले कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत. ही घटना राजकारणाची नाही. आमच्यासाठी राजकारण फक्त निवडणुकीपूरते आहे. एक घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा क्लिन होणार होता. एका घटनेत तुम्ही दोनशे दिवस एका ठिकाणी बसून होते, मग तोच न्याय तुम्ही या प्रकरणाला का देत नाहीत? ही घटना काही लोकांनी ठरवून येऊन केलेली आहे. गावकरी हॉटेलचा मालक विलास घुले भांडण सोडायला गेला आणि तिथेच उमेश मानेला बाजूला ठेवून विलास घुलेची हत्या करण्यात आली, असा आरोपही यावेळी मुंडे यांनी केला आहे.