धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “अजित दादांनी…”
धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना राजीनाम्याला उशीर झाला असला तरी तो झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत सांगितले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे निर्घृण फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला धक्का बसला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर आतापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिली. अखेर आता याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतंच पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीवेळी त्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी कदाचित याला उशीर झाला असेल, पण अखेर राजीनामा झाला, अशी प्रतिक्रिया दिली.
अखेर ८३ दिवसांनी राजीनामा झाला
“अजित पवारांनी निश्चित त्यांना आधी सांगितलं असेल, पण शेवटी काय असतं की पक्ष आहे, पक्षातील कार्यकर्ता आहे. प्रॅक्टिकल काय ते पाहिल्याशिवाय कोणी निर्णय घेत नाही. त्यामुळे कदाचित त्याला उशीर झाला असेल. पण राजीनामा अखेर झाला. अखेर ८३ दिवसांनी राजीनामा झाला”, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
कठोरात कठोर कारवाई करायला हवी
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचे केवळ निलंबन करुन चालणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी. जेणेकरून भविष्यात अशी बेताल वक्तव्य करायची कोणाचीच हिंमत होणार नाही, असे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं.
जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही
पिंपरी चिंचवडमध्ये 9 मार्चला मनसेचा 19वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. राज ठाकरे स्वतः इथून मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. याबाबतची माहिती देताना बाळा नांदगावकरांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणाऱ्या आझमींवर तोंडसुख घेतलं. तसेच मराठा माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसेने आवाज उठवला की, आम्हाला गुंड ठरवलं जातं. मग सरकारची ही जबाबदारी नाही का? असा प्रश्न नांदगावकरांनी उपस्थित केला. मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही. असं म्हणत नांदगावकरांनी बोलणं टाळलं.
