
धारावीचे पुनर्विकासाच्या योजना करण्यासाठी नुसत्या चर्चेत ३० वर्षे निघून गेली. आमच्या सरकारने धारावीतील प्रत्येक नागरिकाचे पुनर्वसन करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. धारावीत ‘एसआरए’ राबवला असता तर व्हर्टीकल झोपड्या तयार झाल्या असत्या, त्यामुळे आपण त्याला स्पष्ट नकार दिला. एक झोपडी तोडून दुसरी बांधायची असे धोरण आम्ही टाळले. आताचे पुनर्वसनाचे डिझाईन चांगले तयार केले आहे. प्रत्येक नागरिकाचे पुनर्वसन केले जाणार आहे.येथील पात्र नागरिकांना ३५० चौ.फूटाचे घर मिळेल. परिसरात उत्तम सोय असेल, मेन्टेनन्स लागणार नाही अशी व्यवस्था असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की धारावीत आपण सर्वांनी माझे भव्य स्वागत केले यासाठी आपले आभार आहेत. ते पुढे म्हणाले की धारावी अनेक लोकांना खूप मोठी स्लम म्हणून माहिती आहे.मात्र, धारावी बहुरंगी धारावी आहे,अतिशय कष्टाळू आणि मेहनती लोकं इथे राहतात. धारावीतील व्यवसायावर ही धारावी उभी आहे. कलाकुसर, विविध वस्तूंची निर्मिती,आर्थिक इकोसिस्टिम आहे. कुंभारवाड्यात काम होणारे काम,चामड्यावर होणार काम, फूड इंडस्ट्री अशा उत्तम गोष्टी धारावीत तयार होतात असेही फडणवीस म्हणाले.
पुर्नविकास व्हायला पाहिजे असे तावातावाने बोलले गेले,मात्र, यातच ३० वर्ष निघून गेलीत. धारावी विकास करताना गार्डन, मैदाने तयार करणार आहोत. पुढची ५ वर्ष अशा लोकांना राज्य सरकारचे कर माफ देखील आम्ही करणार आहोत. प्रत्येक अपात्रांना राहण्यासाठी स्वत:चे हक्काचे घर देणार आहोत. पात्र आणि अपात्र यांचा देखील पुनर्विकास होईल. एक झोपडी काढायची आणि दुसरी तयार करायची असे आपल्याला करायचे नाही. धारावी कोणाला दिली नाही, ती कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नाही. डीआरपी, एसआरए हिस्सेदारी आहे. कोणी विकासक लाटेल असं होणार नाही असे आश्वासनही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
इतक्या वर्षात विरोधकांना विचारा,तुम्ही काय केलं? प्रत्येक धारावीकरांना आम्ही घर दिल्याशिवाय राहणार नाही. मोदीजींना आणून याचे उद्घाटन आपण करुयात. एआयडीएमकेनं देखील भाजपला संपूर्ण समर्थन दिलं आहे, ते देखील प्रचारात उतरतील. येत्या १५ ला मतदान आहे, कमळ आणि धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि उमेदवारांना निवडून द्या. १६ तारखेपासून आम्ही धारावीकरांची काळजी घेऊ असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता.त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की प्रकरणात एसआयटी तयार झालेली, त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे. त्या रिपोर्टचे काही अंश माध्यमांपर्यंत पोहोचले आहेत. ह्या रिपोर्टमध्ये अनेक गंभीर बाबी आहेत. आम्हाला अडकविण्यासाठी कशा वरुनच सूचना होत्या. सूचनांचे पालन करीत तेव्हाचे अधिकारी आणि सीपी कसे काम करत होते आणि लोकांना धमकावत होते, नसलेल्या केसेस तयार करत होते हे यावरुन दिसते. मात्र, ह्या लोकांचा प्रयत्न सफल झाला नाही. अशा प्रकारे कसं सूडाचे राजकारण सुरु होते हे यातून दिसतं आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.