राज्यसभेवर कोणाची वर्णी? जय पवार की भुजबळ? जय पवारांनी अखेर सस्पेन्स संपवला, मोठं वक्तव्य

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमधून दोन नावाची चर्चा आहे. छगन भुजबळ आणि जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर आता जय पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज्यसभेवर कोणाची वर्णी? जय पवार की भुजबळ? जय पवारांनी अखेर सस्पेन्स संपवला, मोठं वक्तव्य
jay pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2026 | 4:37 PM

सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकल्या आहेत. सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीमधून राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमधून दोन नावाची चर्चा आहे, एक म्हणजे मंत्री छगन भुजबळ आणि दुसरं नाव राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांचं आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी याबाबत बोलताना आधीच आपली भूमिका जाहीर केली आहे. आपण राज्यसभेसाठी आग्रही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर यावर आता जय पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले जय पवार?  

राज्यसभेच्या जागेसाठी तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर बोलताना जय पवार म्हणाले की,  माझ्या नावाची चर्चा होत आहे, पण माझी काही इच्छा नाही. मी इथेच सर्वांच्या कामासाठी असणार आहे.  त्यानंतर त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की मग कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या प्रश्नावर मात्र जय पवार यांनी सावध उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. मुंबईमध्ये काय घडामोडी सुरू आहेत मला माहित नाही. वहिनी आणि पार्थ दादा दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील.  परवा मी मुंबईला जाणार आहे, मला माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेन असं जय पवार यांनी म्हटलं आहे.

जनता दरबारावर प्रतिक्रिया 

जय पवार यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं, यावर देखील ते बोलले आहेत.  आज चांगला प्रतिसाद मिळाला. वाटलं नव्हतं एवढे लोकं येतील. पण लोकं समस्या घेऊन आले.
रस्ता पाणी विज असे प्रश्न लोकं घेऊन येत आहेत. असं त्यांनी यावेळी म्हटलं. दादांचं प्रेम सर्वांच्या डोळ्यात अजूनही दिसतं. मी सुद्धा दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज अशा नागरिकांच्या समस्या आहेत, असं यावेळी जय पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us