
Maharashtra Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनधाराकांची संख्या वाढत आहे. परंतु या महामार्गावर लूटमारीच्या घटनाही वाढत आहेत. छत्रपती संभाजीनगरजवळ करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाडी अडवून डॉक्टर दांपत्यास लुटण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याकडून 11 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला.
सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे दिवसाप्रवास करण्यापेक्षा रात्रीचा प्रवास करायला अनेक जण प्राधान्य देत आहेत. त्याचा फायदा दरोडखोर घेत आहेत. समृद्धीवरुन जाणाऱ्या वाहनधारकांची लूट दरोडेखोर करत आहे. 2 मे रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास डॉक्टर चैताली शिंगणे यांचा कारचा पाठलाग एक कार करत होती. पाठलाग करणाऱ्या या गाडीने डॉक्टर शिंगणे यांच्या कारसमोर गाडी लावली. त्यातून चार जण उतरले. त्यांनी डॉक्टरांच्या कारची चावी काढून घेतली. डॉक्टर चैताली शिंगणे आणि त्यांचे पती श्रावण शिंगणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार डॉक्टर चैताली श्रावण शिंगणे यांनी चिकलठाणा पोलीस 3 मे रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरोडेखोरांनी 1 लाख रुपयांचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, 3 लाख रुपयांची चार तोळ्यांची सोन्याची पोत, दीड लाख रुपयांचा लक्ष्मी हार, दीड लाख रुपयांची लहान पोत, 4 लाखांची मोठी पोत, 12 हजारांचा मोबाईल, असा सुमारे 11 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. समृद्धीवर रात्री पडलेल्या या दरोड्यांना आता प्रवास करणाऱ्यामध्ये भीतीच वातावरण आहे.
समृद्धी महामार्ग नागपूर ते इगतपुरीपर्यंत सुरु झाला आहे. इगतपुरी ते आमण हा 76 किलोमीटरचा टप्पा अजून सुरु झाला नाही. एकूण 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गातील 625 किलोमीटरचा महामार्ग सुरु झाला आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचे उद्घघाटन 1 मे रोजी होणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ न मिळाल्याने ते लांबीवर पडले.