भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या गुप्तहेरास अटक, ISI ला पाठवले गोपनीय व्हिडिओ-फोटो
पठान खान याने लष्कराच्या संवेदनशील भागाचे फोटो आणि व्हिडिओ घेतले होते. हे त्याने पाकिस्तानला पाठवले. त्याच्या चौकशीतून आणखी इतर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पैशांच्या मोहात तो जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेची संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलरला शेअर करत होता.

ISI Spy Arrested: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानला भारताच्या सर्व घडामोडींची माहिती हवी आहे. त्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने (आयएसआय) भारतात गुप्तहेर ठेवले आहेत. राजस्थान इंटेलिजन्सने पाकिस्तानला माहिती देणाऱ्या एका गुप्तहेरास पकडले आहे. जैसलमेरमधील मोहनगढ भागातून आयएसआय एजंट पठान खान (40) याला अटक करण्यात आली आहे. तो भारतीय लष्काराची गोपनीय माहिती, व्हिडिओ, फोटो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पाठवत होता.
पठान खान हा दीर्घ काळापासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता. महिन्याभरापूर्वी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्या हालचाली संशायस्पद आढळल्या. त्यानंतर जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात त्याला आणण्यात आले. त्यात आयएसआय हँडलरच्या निर्देशावरुन तो भारताची गोपनीय माहिती पाठवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे १ मे रोजी त्याला अटक करण्यात आली.
२०१३ मध्ये पठान खान पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानात त्याचे अनेक नातेवाईक आहेत. तो पाकिस्तानला गेला असताना आयएसआयसोबत त्याचा संपर्क झाल्याची शक्यता तपास संस्थाना आहे. त्याला ऑफिसियल सीक्रेट एक्टनुसार अटक करण्यात आली आहे. पठान खान हा १२ वर्षांपासून आयएसआयसाठी काम करत होता. परंतु त्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली नाही.
संवेदनशील भागाचे व्हिडिओ पाठवले
पठान खान याने लष्कराच्या संवेदनशील भागाचे फोटो आणि व्हिडिओ घेतले होते. हे त्याने पाकिस्तानला पाठवले. त्याच्या चौकशीतून आणखी इतर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पैशांच्या मोहात तो जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेची संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलरला शेअर करत होता. पाकिस्तानच्या आयएसआयमधील अधिकाऱ्याने त्याला भारतीय सीमकार्डही उपलब्ध करुन दिले होते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सीमेवर बीएसएफ, लष्कर आणि पोलिसांच्या हालचाली वाढल्या आहेत. बीएसएफचे जवान कठोर पहार देत आहे. या परिस्थितीत पाकिस्तानी गुप्तहेर पकडला गेल्यानंतर गुप्तचर संस्था अधिक सतर्क झाल्या आहेत.
