
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एका मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्याच सरकारला मोठा धक्का दिला आहे. खरंतर शिंदे यांची शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी भूमिका अपेक्षित नाहीय. कारण हा मुद्दा अंतर्गत चर्चेमध्ये मांडता येऊ शकतो. सध्या नाशिकच्या तपोवनचा मुद्दा पेटला आहे. नाशिकमध्ये 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशभरातून लाखो साधू, संत आणि भाविक कुंभ मेळ्यासाठी नाशिकमध्ये येतील. या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठी नाशिकमध्ये विकास काम सुरु झाली आहेत. त्यात तपोवनमध्ये साधूग्राम बांधण्याचं नियोजन आहे. त्यासाठी जवळपास 1800 झाडं तोडली जाणार असं बोललं जातय. ही झाडं वाचवण्यासाठी नाशिककरांनी आंदोलन सुरु केलं आहे.
अनेक पर्यटनप्रेमी, नाशिककर तपोवनातील ही 1800 झाडं वाचवण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मागच्या शनिवारी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या तपोवनात आले होते. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली. “निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का,” असा सवाल सयाजी शिंदेंनी केला होता.
वृक्ष तोडीवरुन मंत्री गिरीश महाजन लक्ष्य
तपोवनात झाडं तोडून तिथे साधुग्राम बांधण्याची योजना आहे. याला विरोध होत आहे. आता एकनाथ शिंद यांच्या शिवसेनेने या बद्दल मोठी भूमिका घेतली आहे. त्यांनी ही झाडं तोडायला विरोध केला आहे. त्यासाठी आज संध्याकाळी तपोवनात शिंदेंची शिवसेना झाडं वाचवण्यासाठी आंदोलन करणार आहे. संध्याकाळी 4 वाजता शिवसेना संघटनांचा कार्यालयापासून मार्च निघणार आहे. दुसरीकडे या वृक्ष तोडीवरुन मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य करण्यात येत आहे.“वृक्षप्रेमी तपोवनात आलेत. त्यांनी राग व्यक्त केला. मात्र कुंभमेळा बारा वर्षात एकदा येतो. वृक्ष तोडणीच्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही वृक्षप्रेमी आहोत” असं गिरीश महाजन म्हणाले.