
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुलगा पार्थ पवार याच्या कोरगाव पार्कमधील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. हा जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्याची वेळ ओढवली. आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. अजूनही हे प्रकरण थंड झालेलं नसताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्रमक झालेली दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे आपण बघितलं‘ अशा शब्दात महेंद्र दळवी यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली. “राष्ट्रवादीला भ्रष्टाचार नवीन नाही आहे. याच कोलाड नाक्यावरचा आपण 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार बघितला आहे“ अशी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
“मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी, कशी दिली हे आपण बघितलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचा घात केला. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलाय, ओरबाडून खाल्लाय. तटकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते बालिश बुद्धी सारखे बोलत आहेत. तटकरे फॅमिलीने प्रत्येकाचा घात केला आहे“ अशी टीका महेंद्र दळवी यांनी केली. “मला तीन वेळा फसवलं आहे. भरत शेठ यांना दोन वेळा फसवलं आहे. कर्जत मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठी महायुती सोडून उबाठासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला“ असं महेंद्र दळवी म्हणाले.
आपणास हिशोब चुकता करायचा आहे
“तटकरे साहेब किती खोटं बोलतात, हे महाराष्ट्राला माहिती आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही हिशोब चुकता नक्की करणार. जे काय करायचं असेल तर याच निवडणुकीमध्ये आपणास हिशोब चुकता करायचा आहे. आम्ही तिघेही मातब्बर आहोत. आमच्या मागे शिंदे सरकारचा आशिर्वाद आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना रोह्याची जनता बदल निश्चित घडवून आणेल” असा विश्वास महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.
तेच आमच्या अंगाशी आलं आहे
“आपण खासदार आहात. खासदार हे आमच्या जीवावर निवडून आलात. अनेक सक्रिय कार्यकर्ते सांगत होते, यांना मदत करू नका. मात्र शिंदे साहेबांचा शब्द आम्ही पाळला. सर्वसामान्य जनतेला हात जोडून सांगितलं, एकदा चुकीला माफी देऊया तेच आमच्या अंगाशी आलं आहे. मात्र त्याचा आता शेवट करणं निश्चित आहे. आजची सभा हे तटकरे यांच्या साम्राज्याला सुरुंग लावायचं काम निश्चित करेल“ असं महेंद्र दळवी म्हणाले.