
Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या पात्र महिलांकडून केवायसीची प्रक्रिया करून घेतली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर आज (10 डिसेंबर) राज्य विधिमंडळात मोठी खडाजंगी झाली. विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झाला आहे, असा गंभीर आरोप करत महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे विचारले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर लाडक्या बहिणींसाठी सभागृहात मोठी घोषणा केली.
लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक-अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या योजनेत मोठी गडबड झालेली आहे. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल, असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. लाडक्या बहिणींना नावनोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नये. या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील, असा हल्लाबोल केला. यासह लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार? असे विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभही देऊ, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.