
महायुतीत होणाऱ्या अंतर्गत पक्षांतरामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला या मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यानंतर महायुतील नेत्यांनी बैठक घेत पक्षांतरावर तोडगा काढला होता. एकमेकांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही असं ठरलं असल्याची माहितीही नेत्यांनी दिली आहे. मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे शिवसेना नाराज असल्याच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले. आज सायंकाळी शिंदेंनी अमित शहांचीही भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजपच्या नेत्यांची तक्रार केल्याचे बोलले जात होते. मात्र आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘उद्या बिहार सरकारचा शपथविधी आहे, यासाठी मला निमंत्रण मिळालं आहे. या यशाचं अभिनंदन करण्यासाठी मी अमित शहांची भेट घेतली. यात चांगली चर्चा झाली. घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा आनंद आहे. मी आज रात्री बिहारला जात आहे.’
एनडीएतील नाराजीवर प्रश्न विचारला असता यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘तक्रीरीचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही, मी लढणारा आहे. तुम्ही ते वेळोवेळी पाहिलं आहे. छोट्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो. आम्ही काल बसून चर्चा केली, एकमेकांनी बसून यावर मार्ग काढला आहे. महायुतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तो स्थानिक पातळीवरील विषय होता तो कालचं संपला आहे. महायुती म्हणून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. विधानसभेला जसं मोठ यश मिळालं तसं आगामी काळातही मिळेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.’
अमित शहांसोबत आज झालेल्या भेटीत एकनाथ शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी या आरोपाचं खंडन केलं आहे. आपण फक्त बिहार निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचे अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट घेतल्याचे शहा यांनी म्हटलं आहे.