पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंचं राज्यातील शेतकऱ्यांना मोठं आश्वासन, म्हणाले दिवाळीपूर्वीच…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये जवळपास एक तास बैठक झाली.

राज्यातील भीषण दुष्काळाबाबत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये दुष्काळाबाबत तासभर चर्चा झाली. दुष्काळाचे संकट मोठं असून केंद्र सरकार दुष्काळ निवारणासाठी राज्याला भरीव मदत करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुष्काळात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या बैठकीत पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील दुष्काळावर आस्थेवाईकपणे माहिती घेतली. राज्यातील पाण्याची परिस्थिती, शेतीची स्थिती, जनावरांच्या चाऱ्याबाबत माहिती घेतली. राज्याचे मंत्रिमंडळ बांधावर गेले होते व शेतकऱ्यांना मानसिक आधार दिल्याची माहिती पंतप्रधानांना दिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. दुष्काळाचे संकट मोठं असून शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेतून वार्षिक ६००० आणि राज्याच्या नमो शेतकरी योजनेतून ६००० असे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. गेल्या वर्षी अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मदत केली होती. सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे, तो संकटात असताना सरकार हात आखडता घेणार नाही, असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितलं.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांना काही काम उरलेलं नाही, ते फक्त मोर्चे काढणे, आंदोलन करणे, पंतप्रधानांवर आणि गृहमंत्र्यांवर आरोप करणे यातच ते धन्यता मानत आहेत, अशी बोचरी टीका यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार
विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, पुणे शिक्षक मतदार संघातून मंगेश चिवटे निवडणूक लढवणार अशी चर्चा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत झाली होती. मंगेश चिवटे यांना पक्षाने एबी फॉर्म दिला असून ते उद्या फॉर्म भरतील. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे, त्यानंतर माघारीची प्रक्रिया आहे. या दरम्यान बरेच काही होईल. महाराष्ट्राच्या पातळीवरील विषय महाराष्ट्रातच सोडवू, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी हे ‘एनडीए’चे मुख्य नेते असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत, योग्यवेळी ते निर्णय घेतील, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.