कर्णानंतर दुसरे दानशूर म्हणजे एकनाथ शिंदे, शरद पवारांच्या खास माणसाकडून तोंडभरून कौतुक, पडद्यामागे काय घडतंय?

आज सोलापूरमध्ये होलार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदे यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

कर्णानंतर दुसरे दानशूर म्हणजे एकनाथ शिंदे, शरद पवारांच्या खास माणसाकडून तोंडभरून कौतुक, पडद्यामागे काय घडतंय?
| Updated on: Aug 04, 2025 | 5:47 PM

मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, असं जानकर यांनी म्हटलं आहे. ते माळशिरस येथील होलार समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जानकर? 

उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे,  कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब,  राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस मी कधीही पाहिला नाही. मी 30 वर्षांपासून राजकारणात वावरतो, दुसऱ्या पक्षात आहे, मात्र असा माणूस पाहिला नाही, असं यावेळी उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले  गरीब समाजाला न्याय मिळावा यासाठी हा मेळावा आहे,  गावात घरकुलसाठी होलार समाजाला जागा मिळावी, माळशिरससाठी 100 मुलं आणि मुलींसाठी वसतिगृह मंजूर आहे, मात्र त्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी आहे. होलार समाजाच्या महामंडळासाठी 100 कोटीचा निधी मिळावा, अशी मागणी आहे, असं यावेळी उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.  दरम्यान या मेळाव्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी होलार समाजाच्या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? 

व्यवस्था नाही म्हणून मुलं शिकत नाही, मुलं शिकत नाहीत म्हणून प्रगती होतं नाही. माझं मत आहे, की तुम्ही रस्ता नका मागू त्यापेक्षा मुला मुलींना शिक्षण द्या. त्यासाठी निधी मागा मी देतो. होलार समाजाच्या महामंडळासाठी मी तातडीने 50 कोटींची तरतूद करतो.  तुम्ही 100 कोटीची मागणी केली पण मी 50 कोटी मान्य केले, कारण मी जर 100 कोटी म्हणालो असतो आणि मी देऊ शकलो नाही तर बसलेले लोकं माझे विरोधक होतील, त्यामुळे जेवढे देऊ शकतो तेवढेच आश्वासन मी देतो, असंही यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.