
BJP And Shivsena Clash : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. स्थानिक पातळीवर राजकारण चांगलेच तापले आहे. तिकीट मिळावे तसेच भविष्यातील सोईचे राजकारण लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर अनेक नेते पक्षबदल करत आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्तेदेखील उड्या मारताना दिसत आहेत. काही नेत्यांनी भाजपातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तर काही नेत्यांनी शिंदे, अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळेच आता महायुतीत मोठा नाराजीनाट्य रंगल्याचे समोर आले आहे. आज (18 नोव्हेंबर) मुंबईतील मंत्रालयात या नाराजीचे पडसाद पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी थेट बहिष्कारचे अस्त्र उगारून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर ही बैठक पार पडली. मात्र या बैठकीला शिवसेना पक्षाच्या एकाही मंत्र्याने हजेरी लावली नाही. शिवसेनेच्या सर्वच्या सर्व मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. या बैठकीला शिवसेनेतर्फे फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. बाकी शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. सुरुवातीला निधीवाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रभरात भाजपात इन्कमिंग झाली आहे. त्याचा फटका शेवटी शिवसेनेला बसणार आहे. हेच राजकीय नुकसान लक्षात घेऊन शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या नाराजीमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दालन मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आहे. तेथे जाऊन शिंदे तसेच त्यांच्या मंत्र्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीत भाजपातील इन्कमिंगबद्दल चर्चा झाली. या चर्चेदरम्यान उल्हासनगरमध्ये तुम्हीच याला सुरुवात केली आहे. तुम्ही केलं तर चालवून घ्यायचं असं चालणार नाही असे फडणवीसांनी सांगितल्याचे बोलले जात आहे. तसेच यापुढे एकमेकांच्या पक्षात एकमेकांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नका, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या नाराजीनाट्यानंतर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस यांच बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे चव्हाण-सामंत यांच्यातील बैठकीत नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.