राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात. ते कुणाला कळत नाही, असे भरत गोगावले म्हणाले. त्यानंतर त्यांनी राज्यात लवकरच आणखी एक ऑपरेशन टायगर होणार असल्याचा दावा केला.

राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
eknath shinde and uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 10:22 PM

Eknath Shinde Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगोल्यातील शिवसेना (शिंदे गट) मेळाव्यात केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात लवकरच आणखी एक मोठे राजकीय ‘ऑपरेशन’ होणार असल्याचे संकेत गोगावले यांनी दिले आहेत.

शहाजीबापू पाटलांकडून मेळाव्याचे आयोजन

सांगोला येथे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे तसेच शिंदे गटाच्या आगामी रणनीतीचा उल्लेख केला.

लवकरच राज्यात आणखी एक ऑपरेशन होणार

एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात. ते कुणाला कळत नाही, असे भरत गोगावले म्हणाले. त्यानंतर त्यांनी राज्यात लवकरच आणखी एक ऑपरेशन टायगर होणार असल्याचा दावा केला. मात्र, हे ऑपरेशन नेमके कोणत्या पक्षाशी किंवा कोणत्या नेत्यांशी संबंधित आहे, याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत. “लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल,” असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं कोणतं ‘ऑपरेशन’ होणार, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात विरोधी पक्षातील कोणते नेते किंवा कार्यकर्ते शिवसेनेच्या येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

याआधीही ऑपरेशन टायगरचा उल्लेख

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नुकतेच एक ऑपरेशन टायगर राबवले. या मोहिमेअंतर्गत ठाकरे गटातील एकूण सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे ठाकरेंच्या बंडखोर खासदारांचा हा गट आता शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाला आहे. आता लवकरच ठाकरे यांचे काही आमदारही शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करू शकतात, असा दावा शिंदे यांच्या पक्षातील काही नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. असे असताना आता गोगावले यांनीही लवकरच पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार, असे विधान केल्याने शिंदेंच्या टार्गेटवर कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us