Sonia Gandhi Book Controversy : शिंदे शिवसेनेत एवढीच हिम्मत आहे तर त्यांनी फडणवीसांच्या..सोनिया गांधींचं पुस्तक फाडल्यावर काँग्रेसने दिलं चॅलेंज
Sonia Gandhi Book Controversy : एकनाथ शिंदे शिवसेनेने आज सोनिया गांधी यांच्या बायोग्राफीचं पुस्तक फाडलं. त्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत त्यांना चॅलेंज दिलं आहे. 'ही गद्दार गँग जी आहे, त्यांनी शिंदे सेनेच्या माध्यमातून राजकारणाचं विकृतीकरण केलय'

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सोनिया गांधी यांच्या ‘जर्नी ऑफ लव’पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात मजकूर आहे, म्हणून ते पुस्तक फाडलं. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलले आहेत. “सूर्यावर थुंकल्यावर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही. ही गद्दार गँग जी आहे, त्यांनी शिंदे सेनेच्या माध्यमातून राजकारणाचं विकृतीकरण केलय. त्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्राला दिली” अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी समाचार घेतला. “त्यांच्याकडून संस्कृतपणाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. सोनिया गांधी यांनी एक आठवणींचा ठेवा देशासोबत शेअर केलाय. पुस्तकाचा खप प्रचंड होतोय. वर्ल्ड रेकॉर्ड होतोय. या पुस्तकाला फाडणं म्हणजे सूर्यावर पडदा टाकण्यासारखं आहे” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
“मानसिक दिवाळखोरी आहे शिंदे शिवसेनेची. संस्कृती नव्हतीच, विकृती होती. विकृतीचा टेंभा ते मिरवतायत. मला त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. एकदा त्यांनी ते पु्स्तक वाचावं. त्यानंतर त्यावर चर्चा करावी, वाद-प्रतिवाद करावेत. त्यांना इंग्रजी येत नसेल. सभ्यता, संस्कृती समजून घ्यायची नसेल, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. शिंदे शिवसेनेमध्ये एवढी हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे शिवसेने विरोधात जे निर्णय घेतले, त्या निर्णयाचे जीआर फाडून दाखवावेत” असं आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं.
सासूचे त्यांच्या मांडीवर प्राण गेले
महिलांनीच ते पुस्तक फाडलं? या प्रश्नावरही हर्षवर्धन सपकाळ बोलले. “महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. एक महिला सोनिया गांधी वयाच्या 21 व्या वर्षी सून म्हणून भारतात येतात. 1991 साली त्यांच्या पतीच्या देहाच्या चिंधड्या झाल्या. सासूचे त्यांच्या मांडीवर प्राण गेले. सोनिया गांधी राजीव गांधींच्या विधवा म्हणून वावरल्या. 89 नंतर भारतात राहिल्या. मुलांवर संस्कार केले. पंतप्रधानपद नाकारले. अशा एका मोठ्या महिलेच्या संदर्भात ज्यांना त्यागाची, बलिदानाची परंपरा आहे, त्यांच्याविरोधात अशी कृती अशोभनीय आहे” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरु मारणारे नाही
काँग्रेस काय उत्तर देणार? “ते तसं वागले म्हणून आम्ही तसं करणार नाही. त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरु मारणारे नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. त्यांचा भ्रष्ट कारभार समोर आणणार” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
