पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या त्या वृद्ध मातेला अखेर मिळाली मदत, प्रशासनाकडून मुलांना नोटीस
साताऱ्यामधून काही दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. ही घटना समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला. पोटच्या मुलांनीच आईला वाऱ्यावर सोडले. मुलं सांभाळत नसल्यामुळे अखेर या महिलेला म्हातारपणात जगण्यासाठी एका मंदिराचा आसारा घ्यावा लागला.

साताऱ्यामधून काही दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. ही घटना समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला. पोटच्या मुलांनीच आईला वाऱ्यावर सोडले. मुलं सांभाळत नसल्यामुळे अखेर या महिलेला म्हातारपणात जगण्यासाठी एका मंदिराचा आसारा घ्यावा लागला. रुक्मिणी सदाशिव भस्मे असं या 65 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. मात्र अशाही अवस्थेमध्ये एक दिवस आपली मुलं आपल्याला नक्की भेटायला येतील अशी आशा या महिलेला आहे. रुक्मिणी भस्मे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगर येथे राहत होत्या, मात्र पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा हाकणं कठीण झालं, त्यामुळे अखेर त्यांनी आपल्या दोन मुलांसह वारणानगर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मुरूड या आपल्या मुळ गावी परतल्या. परंतु रोजगाराचं कुठलंही साधन नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांसह सातारा गाठलं.
गेल्या दहा वर्षांपासून त्या साताऱ्याच्या वेगवेगळ्या भागात राहतात. त्यांच्या मुलांची लग्न देखील झाली नाहीत, मात्र त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना एकटच सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यामध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये त्या एकट्याच राहत होत्या, मुलं त्यांना भेटण्यासाठी देखील येत नव्हते. परंतु त्या जिथे राहत होत्या, त्या खोलीचं भाडं देखील अनेक महिन्यांपासून थकल्याने रूम मालकाने त्यांना घर खाली करण्यास सांगितलं, त्यानंतर त्यांना फक्त मंदिराचाच आधार राहिला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दाखवली होती, त्यानंतर या प्रकरणाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे, संबंधित मुलांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
घरभाडे परवडत नसल्याचे कारण देत दोन मुलांनी आपल्या आईला वाऱ्यावर सोडून दिल्याची घटना साताऱ्यामध्ये घडली होती. याची बातमी काही दिवसापूर्वी TV9 मराठीवर प्रसिद्ध झाल्यानंतर वेळे येथील यशोधन अनाथ आश्रम संस्थेचे रवी बोडके यांनी तातडीने त्या मुलांच्या आईला आपल्या अनाथ आश्रमात आश्रय दिला. यानंतर सातारा प्रांताधिकारी आशिष बारकुल यांनी संबंधित दोन्ही मुलांना नोटीस बजावली आहे. वृद्ध आईला निर्वाह भत्ता मंजूर करण्याबाबत आणि दोन्ही मुलांनी आईच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी असे निर्देश या नोटीसीमध्ये देण्यात आले आहेत. 18 सप्टेंबर रोजी याप्रकरणात शुक्रवारी न्यायाधिकरणासमोर सुनावणी होणार आहे. रुक्मिणी सदाशिव भस्मे यांच्या दोन मुलांपैकी एकाला नोटीस पोहोचली, तर दुसरा मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध सुरू आहे.