एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, थेट माजी नगराध्यक्षाला दिला पक्षात प्रवेश, शिवसेनेची ताकद वाढली

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, थेट माजी नगराध्यक्षाला दिला पक्षात प्रवेश, शिवसेनेची ताकद वाढली
Vishal Patil Shivsena
Image Credit source: X
| Updated on: Dec 07, 2025 | 3:12 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगर पालिका आणि नगर परिषदांचे मतदान पार पडले आहे. याचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यातील महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांचीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच सत्ताधारी पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच अनेक नेते आता पक्षांतर करताना दिसत आहे. अशातच आता वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेवेची ताकद वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विशाल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेने आपल्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात पक्षाने लिहिले की, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर जिल्ह्यातील वसई – विरार येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष विशाल पाटील तसेच माजी नगरसेवक भूषण पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी अमोल पाटील, विशाल पाटील आणि तुषार पाटील यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार आणि शिवसेना पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक उपस्थित होते.

कल्याण डोंबिवलीमध्येही शिवसेनेची ताकद वाढली

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वीही शिवसेनेची ताकद वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे, संदेश पाटील आणि बाळा म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेन ठाकरे गटाच्या महिला शहर संघटीका मंगला सुळे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री उदय सामंत, विश्वनाथ राणे, बंडू पाटील, नितीन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.