
नवी मुंबईचे माजी आमदार गणेश नाईक यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि धीरूभाई अंबानी यांच्याबदद्लचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच राजकीय रहस्ये उघड केली आहे.
“धीरूभाई अंबानी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे हे चांगले मित्र होते. ते सी विंड – कफ परेड येथे धीरूभाई अंबानी यांच्या घरी ८-१५ दिवसांनी गप्पा मारायला एकत्र बसायचे. त्यावेळी धीरूभाई अंबानी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना गणेश नाईक यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती.” असा किस्सा माजी आमदार गणेश नाईक यांनी सांगितला.
“धीरूभाई अंबानी यांच्या कंपनीत माझी युनियन असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. पण बाळासाहेब ठाकरे मनाने दिलदार होते. त्यांच्या मनात एक आणि डोक्यात दुसरे असे कधीच नव्हते. मात्र, कोणीतरी त्यांच्या कानावर चुकीची माहिती घातली, ज्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण झाले. पण जेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली, तेव्हा त्यांनी क्षमा मागण्यास कधीच संकोच केला नाही,” असे गणेश नाईक म्हणाले.
“एका बैठकीत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यात चर्चा सुरू होती. मला माहित नाही तिथे काय बोलणे झाले. मनोहर जोशी काहीतरी लिहित होते. त्यानंतर बाळासाहेबांनी मला एक चिठ्ठी दिली. ती प्रेसला द्यायला सांगितली. मी गाडीत बसलो आणि ती चिठ्ठी विकास महाडिकला वाचायला दिली. ती वाचल्यावर मी बाळासाहेबांना फोन केला आणि म्हणालो, ‘मला हे पसंत नाही आणि मी ही चिठ्ठी प्रेसला देणार नाही.’ त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘तुला जे योग्य वाटेल ते कर’,” असा प्रसंग गणेश नाईक यांनी सांगितला.
१९९५ च्या निवडणुकीनंतर मनोहर जोशी यांनी गणेश नाईक यांना मुख्यमंत्र्यांबद्दल विचारले होते. त्यावर गणेश नाईक म्हणाले, “जर १४५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. १४४ जागा मिळाल्या, तर सुधीर जोशी आणि त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या, तर तुम्हाला म्हणजेच मनोहर जोशींना संधी आहे.” शेवटी तसेच घडले. शरद पवार यांनी मराठवाडा आणि विदर्भातील आमदारांना एकत्र आणून सरकार स्थापन केले. १९९२ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी गणेश नाईक यांना गट नेता बनण्याची सूचना केली. गणेश नाईक यांनी ज्येष्ठ नेत्यांना डावलणे योग्य नसल्याचे सांगून नकार दिला. पण नंतर शिवसेना भवनात बाळासाहेबांनी त्यांची गट नेतेपदी घोषणा केली, असेही गणेश नाईक म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरे आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी पालकमंत्री, संजीव नाईक खासदार, संदीप नाईक आमदार आणि सागर नाईक नवी मुंबईचे महापौर होतो. आमच्या मनात कोणतेही पाप नसल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो. आजही ठाकरे आमच्याबद्दल वाईट बोलत नाहीत. मीही त्यांच्याबद्दल वाईट बोललो नाही. शरद पवारांनी अजित पवारांना तीन खाती दिली. तशीच मलाही दिली होती. आज माझे शरद पवार यांच्याशी कोणतेही कटु संबंध नाहीत, असे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. गणेश नाईक यांच्या या मुलाखतीमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.