मेघना बोर्डीकरांच्या व्हिडीओवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

शनिवारी रोहित पवार यांनी मंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता, या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं, आता या व्हिडीओवर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मेघना बोर्डीकरांच्या व्हिडीओवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
devendra fadnavis
| Updated on: Aug 03, 2025 | 8:29 PM

रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळत असतानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओमुळे वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, मात्र त्यांचा राजीनामा काही घेण्यात आला नाही, त्याऐवजी खाते बदल करण्यात आला. माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं, तर कोकाटे यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान आता त्यानंतर शनिवारी रोहित पवार यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ‘याद राख, मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली घालील आता, आत्ताच्या आत्ता बडतर्फ करुन टाकेल,’ असा इशारा या व्हिडीओमधून ग्रामसेवकाला देण्यात आला आहे. या व्हिडीओची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बावू करू लागलो तर हे योग्य नाही. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात काही चुकीचे असतात, मेघना बोर्डीकर यांच्यासोबत बोलणं झालं आहे, त्यांचं बोलणं माध्यमांवर अर्धवट दाखवण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या काय बापाचं जातं, असं वक्तव्य केलं होतं, त्यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट जे बोलले त्यात चुकीचं वाटत नाही, मात्र संयम ठेवून बोललं पाहिजे, असा सल्ला यावेळी फडणवीस यांनी शिरसाट यांना दिला आहे.