अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल, बीड येथे वीज कोसळून शेतकरी ठार, शेतमालाचे मोठे नुकसान

राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाल्याने मोठे शेतकऱ्यांच्या पिकमालासह पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. बीड येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल, बीड येथे वीज कोसळून शेतकरी ठार, शेतमालाचे मोठे नुकसान
unseasonal rains
| Updated on: Apr 02, 2026 | 6:54 PM

अवकाळी पाऊस आणि गारपीठेने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बीड येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात गहू कांदा पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गहू, मका, कांदा, बाजरी आणि ज्वारी या रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्याला फटका

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे शेतमालासह पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासुन या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस तयार असलेला कांदा शेतातच कुजला झाला आहे.तर दुसरीकडे आंबा,डाळिंब यांसारख्या फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे फळांची गळती झाली असून भाजीपाला आणि इतर तरकारी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार गारपीट…

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटाका बसला आहे. कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. गहू, कांदा पिकासह फळबांगाचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज कोसळून बीडच्या पाली गावातील शेतकरी मृत्यमुखी

बीड तालुक्यातील पाली या गावातील शेतकरी वसंत राऊत यांचा काल सायंकाळच्या सुमारास शेतामध्ये असताना वीज कोसळून मृत्यू झाला आहे. शेतीमध्ये काम करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि या दरम्यान वीज कोसळल्याने वसंत राऊत या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गडचिरोलीत मक्याचे नुकसान

गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मका भात आणि मिरची अशी अनेक हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. दहा दिवसानंतर मक्का तोडणी होणार होती, परंतु अवकाळी पावसामुळे मक्याचे पिक जमीन दोस्त झाले आहे.

वर्धा जिल्ह्यात वीज खांब कोसळले, घरांचे पत्रे उडाले

वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुसूंद येथे जोरदार वाऱ्यामुळे तीन विद्युत खांब कोसळल्याची घटना झाली आहे. तर काही घरांवरील पत्रे उडाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. – वातावरणातील बदलामुळे उन्हाळी पिक, फळपिक उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.

नंदूरबार येथे पिकांचे नुकसान

नंदुरबार शहरात आणि परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू, मका, कांदा, बाजरी आणि ज्वारी या रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने पुढील काही काळ सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

एकरी एक लाख रुपयांचे नुकसान भरपाई मागणी

जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. चिंचोली शिवारात जोरदार वादळी वाऱ्यामुळे इतर पिकांबरोबरच केळी बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. चिंचोली शिवारातील शेतात केळीची खोडे आडवी पडून जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. केळीच्या शेतातील चार ते पाच हजार केळीच्या खोडांपैकी 1200 खोड आडवी पडून जमीन दोस्त झाली आहेत. केळीच्या झाडाला घड लागलेली होती, काही दिवसांनी कापणी होणार होते मात्र त्यापूर्वीच अवकाळी पाऊस आल्याने मोठे नुकसान झाले आहे.लागवडीला मोठा खर्च झाला मात्र आता थोडेफार उत्पन्न हातात येईल अशी अपेक्षा होती मात्र, अवकाळीने नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे एकरी एक लाख रुपयांचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

अक्षता पडत असतानाच वरुण राजाचे आगमनाने तारांबळ

रत्नागिरी- लग्नाच्या अक्षता पडत असतानाच वरुण राजाचे आगमन झाल्याने तारांबळ उडाल्याची घटना घडली आहे. खेडशी गावात दुपारच्या सुमारातील प्रकार घडला. लग्नाच्या अक्षता पडत असताना पावसाचे आगमन झाल्याने वऱ्हाडी मंडळीची धावपळ उडाली. खेडशी गावात अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने ही तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळपासून कोकणात पावसाळी वातावरण असून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Follow Us