कर्जमाफीच्या आंदोलनाला यश कुणामुळे मिळालं? बच्चू कडूंनी ‘या’ लोकांना दिले यशाचे श्रेय

Bachchu Kadu: शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू हे आंदोलन करत होते. या आंदोलनाची दखल घेत सरकारने बच्चू कडू यांना बैठकीसाठी मुंबईमध्ये बोलावले होते. या बैठकीमध्ये 6 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू असा शब्द सरकारने बच्चू कडू यांना दिला आहे.

कर्जमाफीच्या आंदोलनाला यश कुणामुळे मिळालं? बच्चू कडूंनी या लोकांना दिले यशाचे श्रेय
Bachchu Kadu
| Updated on: Oct 31, 2025 | 3:53 PM

शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू हे आंदोलन करत होते. या आंदोलनाला राज्यभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत सरकारने बच्चू कडू यांना बैठकीसाठी मुंबईमध्ये बोलावले होते. या बैठकीत आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चा झाली. या बैठकीमध्ये 6 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू असा शब्द सरकारने बच्चू कडू यांना दिला आहे. त्यानंतर आता बच्चू कडू हे नागपूरला परतले आहेत. यावेळी शेतकरी आंदोलक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निस्वार्थपणे काम करणाऱ्यांनी कर्जमाफी खेचून आणली

मुंबईवरून परतल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना कडू म्हणाले की, ‘आमच्यापेक्षा तुमचे कर्तव्य खूप मोठे आहे. ही लढाई तुम्ही जिंकली आहे. एकीच बळ किती मोठे असतं हे समोर आलं आहे. 13 महिने पंजाबचं आंदोलन चाललं आपण 3 दिवस आंदोलन केले. 31 वर्षांनंतर सर्वात मोठं आंदोलन आपण केलं. निस्वार्थपणे काम करणाऱ्यांनी ही कर्जमाफी खेचून आणली.’

कार्यकर्ता शेतकऱ्यासाठी माय म्हणूण उभा राहिला

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला या आंदोलनाने ताकद दिली आहे, त्याला माहिती आहे की आपला भाऊ आणि नेता आपल्यासाठी उभा आहे. कार्यकर्त्यांनी एकीने काम केले, जी भावना आणि विचार घेऊन आला होता त्यामुळे हे यश मिळाले कार्यकर्ता शेतकऱ्यासाठी माय म्हणूण उभा राहिला. गोळी लागली तरी चालेल या विचाराने कार्यकर्ता लढत होता.’

घरी बसून बोलणं सोपं आहे पण…

बच्चू कडू यांच्या आंदोलनावर काही लोकांनी टीका केली होती. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘घरी बसून बोलणं सोपं आहे पण लढणं कठीण आहे. आताच कर्जमाफी झाली पाहिजे त्यांनी स्वत: लढावं. त्यांनी आंदोलन कराव, त्यांनी आणखी जवळची तारीख आणावी. आम्ही तुम्हाला मदत करू. सरकारकडून आपण किमान आम्ही तारीख तरी घेऊन आलो आहे
31 जून 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल.’

मी सर्वाचे आभार मानतो…

सरकारसोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबाबत बोलताना कडू म्हणाले की, ‘आमची अडीच तास चर्चा झाली, ते समिती गठित करतो आणि तारीख देतो असं म्हणाले मात्र आम्ही म्हटले तारीख द्या नंतरच आम्ही उठतो. नंतर बैठका झाल्या आणि तारीख जाहीर झाली. आता फक्त थकीत नव्हे तर चालू वर्षातील शेतकरी कर्जमाफीत बसणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला की आम्ही कर्जमाफी करू, मी त्यांचं अजित पवारांचं आणि मुख्यनंमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, आपला कोणी शत्रू नाहीये, जो शेतकऱ्यांना नडतो तो आपला शत्रू. पण तुम्ही काय दगाफटका केला तर आंदोलन रक्तरंजित होऊ शकतं. आम्हाला आंदोलनासाठी ट्रेनिंग घ्यावी लागत नाही. आम्ही कधीही आंदोलनाला सुरुवात करू शकतो, आणखी 8 दिवसांनी आम्ही चर्चा करणार आहोत.