कांद्याच्या भावात मोठी घसरण; बळीराजा हवालदिल

| Updated on: Mar 01, 2021 | 11:39 AM

राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे. | Onion rates in Maharashtra

कांद्याच्या भावात मोठी घसरण; बळीराजा हवालदिल
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिक:राज्यासह देशांतर्गत उन्हाळ कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या (Onion) बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री होणाऱ्या कांद्याला 2000 ते 2200रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (Onion rates in Maharashtra)

देशांतर्गत ठिकाणी अवकाळी पावसानंतर उन्हाळी कांद्याची आवक राज्यासह गुजरात, राजस्थान ,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात लाल कांद्याची 50 हजार क्विंटल आवक झाली होती त्याला किमान 900 रुपये , कमाल 4390 रुपये तर सर्वसाधारण 3004 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला होता, तर उन्हाळी कांद्याची 7 हजार क्विंटल आवक झाली होती. त्याला किमान 911 रुपये , कमाल 4220 रुपये तर सर्वसाधारण 2684 रुपये प्रति क्विंटलला इतका बाजार भाव मिळाला होता त्या तुलनेत आज सोमवारी एक हजार रुपयांची घसरण होत लाल कांद्याला किमान 1100 रुपये , कमाल 2840 रुपये तर सर्वसाधारण 2300 रुपये तर उन्हाळ कांद्याला किमान 1000 रुपये , कमाल 2951 रुपये तर सर्वसाधारण 2350 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.

‘केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा’

50 ते 60 हजार रुपये एकरी खर्च केले मात्र अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे पीक वाया गेले होते. आतादेखील कांद्याचा बाजारभाव कवडीमोल असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. मागील आठवड्यात चार हजार रुपये भावाने कांदा विक्री केला होता. त्यातीलच कांद्याला आज दोन हजार ते बावीसशे रुपये बाजार भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

संबंधित बातम्या:

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

कांद्याचे दर कोसळले, निर्यातबंदी हटवण्याची मागणी

(Onion rates in Maharashtra)