
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नेपाळमध्ये सुरु असलेला हिंसाचार भारतात सुद्धा होऊ शकतो, असे विधान केले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेना शिष्टमंडळाने आज (शुक्रवार) मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन राऊत विरोधात कारवाईची मागणी करणारे लेखी निवेदन दिले. यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार तुकाराम काते, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी खासदार संजय निरुपम, उपनेत्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, सुशिबेन शहा, आशा मामेडी, संजना घाडी, सुवर्णा करंजे, शिशिर शिंदे, तृष्णा विश्वासराव आदि पदाधिकारी उपस्थित होते.
भारताचा शेजारी देश नेपाळमधील तरुणाई सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहे. नेपाळ हिंसाचाराचे समर्थन करणारे आणि तशी परिस्थिती भारतात निर्माण होईल, असे देशविरोधी मत सोशल मिडियावर व्यक्त करणाऱ्या संजय राऊतवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे मत शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केले आहे.
संजय राऊत सारखी व्यक्ती जे बोलते त्यामुळे शहरात बॉम्बच्या अफवा पसरणे, धमकीचे कॉल येणे असे प्रकार घडू शकतात त्यामुळे पोलीसांनी राऊत यांची चौकशी करणे आवश्यक आहे. राऊत पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आलेले आहेत. राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत. राऊत सातत्याने सोशल मिडियावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, देशाविरोधी गरळ ओकतात, त्यामुळे राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त देवेन भारती संजय राऊतांवर कारवाई करणार का? त्यांना समज देणार की गुन्हा दाखल करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.