राज्यात 5 वेगवेगळे भीषण अपघात, 30 हून अधिक प्रवासी जखमी ; कुठे काय घडलं?

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाच वेगवेगळे अपघात झाले असून यामध्ये तीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हे अपघात कुठे आणि कसे झाले, त्याविषयी सविस्तर जाणून घ्या..

राज्यात 5 वेगवेगळे भीषण अपघात, 30 हून अधिक प्रवासी जखमी ; कुठे काय घडलं?
अपघात
Image Credit source: Tv9
| Updated on: Jun 08, 2026 | 11:18 AM

राज्यात विविध ठिकाणी पाच वेगवेगळे अपघात झाले आहेत. बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर पिंपरी-माळी गावाजवळ खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यधुंद चालकाची गाडी डिव्हायडर आणि ट्रकला धडकली. यात चार जण गंभीर जखमी झाले. पुणे-सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याजवळ खोपी गावाच्या हद्दीत भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कलल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने ही बस पूर्णपणे पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर नाशिक-मुंबई महामार्गावर मुंडेगावाजवळ कारचं टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. याशिवाय मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे-बोरज इथं कार दरीत कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या अपघातांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

बुलढाणा

बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर मेहकरजवळील पिंपरी माळी गावात खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. समोर जाणाऱ्या ट्रकला खाजगी प्रवासी बसने पाठीमागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. जवळपास एक ते दीड तास काही प्रवासी बसमध्येच अडकून होते. अखेर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ही खाजगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. या घटनेत 20 ते 25 प्रवासी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

छत्रपती संभाजीनगर

पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीनजवळ मद्यधुंद चालकामुळे चारचाकीचा अपघात झाला. ही गाडी महामार्गावरील डिव्हायडर आणि ट्रकला धडकली. त्यात चार जण गंभीर जखमी झाले. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. चारचाकीतील मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात आधी तीन वाहनांना हुलकावणी दिली. त्यानंतर एका वाहनाला धडक देत रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळून समोरील ट्रकच्या पाठीमागे जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जगदीश सिंग, जोगिंदर चौधरी, इसाक चांद महमद पठाण आणि बानो इसाक पठाण अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत.

भोर, पुणे

पुणे – सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याजवळ खोपी गावाच्या हद्दीत भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरात कलल्याने अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना बसचा हा अपघात झाला. या अपघातात बस मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या गटरात जाऊन अडकली. सुदैवाने बस पूर्णपणे पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.

इगतपुरी

नाशिक-मुंबई महामार्गावर मुंडेगावाजवळ कारला अपघात झाला. कारचं टायर फुटल्याने कार दुभाजकाला जाऊन धडकली आणि त्यात तीन जण जखमी झाले. जखमींना घोटी इथल्या खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे-बोरज इथं रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कार 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघतात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. गणपतीपुळे इथं दर्शनासाठी जाऊन परत ठाण्याकडे निघालेल्या या कुटुंबाच्या वाहनाला हा अपघात झाला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री 9.45 च्या सुमारास ही कार खेड तालुक्यातील मोरवंडे-बोरज इथल्या सुरभी हॉटेलसमोर आली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक गाय आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळली.
या अपघातात सिद्धी नाईक, रिद्धी नाईक, स्नेहल नाईक, सिद्धेश नाईक आणि तेजस बोरकर हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Follow Us