चला गणपतीक गावाक जावची तिकीट बुक करुक व्हयी ! नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु…

सालाबादप्रमाणे यंदा मुंबई - गोवा महामार्गाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही ! त्यामुळे यंदाही कोकणात गणपती सणाला जाण्यासाठी रेल्वे मार्गावरच विसंबुन राहावे लागणार आहे. कोकणातील नियमित गाड्यांचे आरक्षणाच्या तारखा प्रवासी बळीराम राणे यांनी दिल्या आहेत.

चला गणपतीक गावाक जावची तिकीट बुक करुक व्हयी ! नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु...
ganpati festival 2025
| Updated on: Jun 19, 2025 | 9:10 AM

यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन बुधवार दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी ६० दिवस आधी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण आता गणेश चतुर्थीची तारीख पहाता साधारण २३ जूनपासुन सुरु करावे लागणार आहे. तरीही गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस चाकरमानी कोकणात जात असल्याने २५ आणि २६ ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांचे आरक्षणाला जादा मागणी असणार आहे.

गेल्यावर्षी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शनिवार ७ सप्टेंबर- २०२४ रोजी झाले होते. यावर्षी १२ दिवस अगोदर म्हणजे बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी गणपत‌ी बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे ६० दिवसआधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा चार्टखालील प्रमाणे असणार आहे.  यंदाही मध्य रेल्वे कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल गाड्यांना सोडणार आहे. गेल्यावर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेने अडीचशे अधिक स्पेशल गाड्या कोकणात सोडल्या होत्या. या शिवाय एसटी महामंडळाने देखील २००० हून अधिक जादा बसगाड्यांची तजवीज केली होती.

आरक्षण दिनांक –      प्रवासाचा दिनांक

२३ जून, सोमवार –      २२ ऑगस्ट, शुक्रवार

२४ जून, मंगळवार –     २३ ऑगस्ट, शनिवार

२५ जून, बुधवार –      २४ ऑगस्ट, रविवार

२६ जून, गुरुवार –   २५ ऑगस्ट, सोमवार

२७ जून,शुक्रवार – २६ ऑगस्ट, मंगळवार – हरितालिका

२८ जून, शनिवार – २७ ऑगस्ट, बुधवार – श्री.गणेश चतुर्थी

२९ जून, रविवार – २८ ऑगस्ट, गुरुवार – ऋषी पंचमी

३० जून, सोमवार – २९ ऑगस्ट, शुक्रवार

०१ जुलै, मंगळवार – ३० ऑगस्ट, शनिवार

०२ जुलै, बुधवार – ३१ ऑगस्ट, रविवार – गौरी आगमन

०३ जुलै, गुरुवार – ०१ सप्टेंबर, सोमवार – गौरी पूजन

०४ जुलै,शुक्रवार- ०२ सप्टेंबर,मंगळवार – गौरी गणपती

कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे बुकींग साधारण २३ जूनपासून सुरु होत आहे. या गाड्यांचे आरक्षण सुरु होताच फुल होत असते. इतकी प्रवाशांची गर्दी कोकणात गणपतीत जाण्यासाठी असते. त्यामुळे मध्य रेल्वे कोकण मार्गावर अडीचशेहून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडत असते. या गाड्यांना देखील गर्दी होत असते. मुंबई गोवा मार्गाची अवस्था बिकट असल्याने यंदाही चाकरमान्यांना रेल्वेचा प्रवास बरा पडणार आहे. त्यामुळे गणपतीच्या सणाला रेल्वेवरच विसंबून रहावे लागणार आहे.

पावसाळी वेळापत्रक जारी

कोकण मार्गावर आता पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे. या काळात कोकणातील ट्रेनना कमी वेगाने चालवले जाते. चार महिने पावसाळी वेळापत्रकानुसार ट्रेनची वाहतूक होत असते. कोकण रेल्वेने पावसाळ्यात ट्रेनची वाहतूक नीट व्हावी यासाठी जागोजागी पेट्रोलिंगसाठी सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.