
तुम्ही गणपतीला दर्शनासाठी गेला आहात आणि अचानक तुमचे अपहरण झाले, तर काय होईल! असाच काहीसा प्रकार वांगणीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत घडला. १ सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी तो गुजरातमध्ये गेला होता. पण तिथेच तीन अज्ञातांनी त्याला पळवून नेले. यानंतर खंडणीसाठी त्याच्या आईला फोन आला. त्यानंतर ५ दिवसांचा थरार रंगला. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या अपहरण प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावत वांगणीतील एका अल्पवयीन मुलाची गुजरातमधून सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींनाही अटक केली आहे.
वांगणीमध्ये राहण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा मुलगा १ सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी गुजरातला गेला होता. तिथेच काही अज्ञात व्यक्तींनी त्याला पळवून नेले. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या आईकडे फोन करून १२ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. या धमकीनंतर घाबरलेल्या आईने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ही तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. यानंतर तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानंतर एक विशेष पथक गुजरातला रवाना केले. गुजरात पोलिसांच्या मदतीने अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी कबूल केले की त्यांनी घाबरून त्या मुलाला एका बस स्टॉपवर सोडून दिले होते. या घटनेमुळे मुलगा इतका घाबरला होता की त्याने आपला मोबाईल बंद करून सिमकार्ड बदलले. त्यामुळे सुरुवातीला त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले.
मात्र, पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी मुलाच्या मोबाईलचा IMEI नंबर ट्रेस केला. त्यावरून त्याचा नवा नंबर शोधून काढला. हा एक निर्णायक क्षण होता. ज्यामुळे पोलिसांना मुलाचा ठावठिकाणा कळू शकला. चार दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर पोलिसांना त्या मुलाला शोधण्यात यश आले. चाळीसगावजवळच्या एका खेड्यातून मुलाला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. त्याला जेव्हा आईकडे परत देण्यात आले, तेव्हा दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. दरम्यान हा थरारक तपास आणि मुलाची सुखरूप सुटका यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे