
Urmila Kendre : राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी केली जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या निवडणुकीत महायुतीनेच बाजी मारल्याचे दिसत आहे. ही निवडणूक स्थानिक पदाधिकाऱ्यांची होती. त्यामुळेच स्थानिक पातळीवर आपलेच वर्चस्व आहे, हे सिद्ध करण्यासाठी आमदार, खासदार तसेच मंत्र्यांनी आपली प्रतीष्ठा पणाला लावली होती. काही ठिकाणी सत्ताधारी नेत्यांना धक्का बसताना दिसतोय. तर काही ठिकाणी मात्र महायुतीच वरचढ ठरताना दिसत आहे. सध्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण या नगरपंचायतीसाठी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे उभ्या होत्या. त्यांनी मात्र या निवडणुकीत बाजी मारली असून खुद्द धनंजय मुंडे या विजयोत्सवात सहभागी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्या निवडणूक लढवत होत्या. याच गंगाखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र आघाडीवर आहे. आपल्या बहिणीचा विजय झाल्याचे समजताच धनंजय मुंडे हे गंगाखेडमध्ये दाखल झाले आहेत. बहिणीच्या विजयोत्स्वात ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या बहिणीचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांची निवडणुकी चांगलीच चुरशीची झाली होती. एकूण सात नगरपालिकांपैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेचा उमेदवार आघाडीवर आहे. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मात्र सेलू नगरपालिकेत मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. जिंतूरमध्ये भाजपा आघाडीवर आहे. पण सेलूमध्ये मात्र काँग्रेस वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सोनपेठ आणि मानवत या नगरपालिकेच्या निकालात अजित पवार यांच्या पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी नुकतेच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यानंतर आता काही ठिकाणी काँग्रसेच्या पक्षाचेही उमेदवार विजयी होत असून काँग्रेसला चांगले दिवस आल्याचे सांगितले जात आहे.