शरद पवार माझे मेंटोर, गौतम अदानी यांचं मोठं वक्तव्य…बारामतीतील भाषणाची राज्यात चर्चा!

गौतम अदानी, शरद पवार, अजित पवार हे आज एका मंचावर आले होते. गौतम अदानी यांनी शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले.

शरद पवार माझे मेंटोर, गौतम अदानी यांचं मोठं वक्तव्य...बारामतीतील भाषणाची राज्यात चर्चा!
SHARAD PAWAR AND GAUTAM ADANI
Image Credit source: X, TWITTER
| Updated on: Dec 28, 2025 | 4:18 PM

Gautam Adani And Sharad Pawar : उद्योजक गौतम अदानी हे भारतातील उद्योग विश्वातलं एक अग्रगण्य नाव आहे. दुसरीकडे महाराष्ट्र तसेच भारताच्या राजकारणात शरद पवार यांचाही मोठा दबदबा आहे. गौतम अदानी यांच्या उद्योगांमुळे आजा लाखो हातांना काम मिळते तर शरद पवार यांच्या धोरणामुळे महाराष्ट्र तसेच भारतात अनेक आमूलाग्र बदल झालेले आहेत. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आज (28 डिसेंबर) एकाच मंचावर दिसून आले. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतम अदानी आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले होते. यावेळी गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. शरद पवार माझे मेंटोर आहेत असं मोठं विधान गौतम अदानी यांनी केलं आहे.

शरद पवार माझे मार्गदर्शक

बारामतीत उभारलेल्या एआय सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी गौतम अदानी यांनी भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी शरद पवार यांच्या कामाचे कैतुक केले. ‘एआय सेंटरच्या उद्घाटनाचा आमच्यासाठी खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे. जगात अशी काही ठिकाणे असतात जी केवळ नकाशावरील एक बिंदू नसतात. तर प्रगती, बदल आणि संधींचे शक्तिकेंद्र म्हणून ही ठिकाणे ओळखली जातात. बारामती हे अशाच एका परिवर्तनाचे, अमर्याद शक्यता असलेले प्रतीक आहे, असे गौतम अदानी म्हणाले. तसेच बारामती शहराच्या विकासात शरद पवार यांच्या योगदानावविषयी बोलताना एक असामान्य नेते आणि माझे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांच्या दूरदृष्टीमुळे बारामती हे शहर अमर्याद शक्यतांचे प्रतिक आहे, असेही गौतम अदानी म्हणाले.

गौतम अदानी यांनी शून्यातून सुरुवात केली

याच कार्यक्रमात पुढे शरद पवार यांनीही भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी गौतम अदानी यांचे कौतुक केले. आज या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी थेट गौतम अदानी बारामतीत आले आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. गौतम अदानी देशात उद्योग क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव आहे. अनेक क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. त्यांनी शून्यातून सुरुवात केली. गुजरातमध्ये पालमापूर हे गाव आहे. त्या ठिकाणी उद्योगाला मर्यादा आहेत, हे लक्षावर आल्यावर ते मुंबईला आले. मुंबईला आल्यावर त्यांच्या खिशात काही नव्हतं. जो कोणी कष्ट करतो त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही. त्याचा फायदा गौतम भाईंनी घेतला, असे कौतुक शरद पवार यांनी केले.

पुढेही लाखो हातांना काम मिळेल

पुढे बोलताना, जर बघितलं तर देशातील 23 राज्यात अदानी ग्रुपाच व्यवसाय आहे. त्यांनी लाखो हाताना काम दिले आहे, असेही शरद पवार म्हणाले. तसेच आणखी लाखो मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल असा विश्वासही यावेळी त्यांनी बोलून दाखवला.