
मुंबई : महाराष्ट्रातील पुणे – बारामती या मार्गावर सासवड नावाचे एक छोटे शहर आहे. शहर छोटे असले तरी या शहराचा इतिहास मात्र मोठा दैदिप्यमान आहे. या शहराला हे नाव कसे पडले याच्या काही कथा आहेत. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने येथे तप केले होते. त्यामुळे या भूमीला ब्रह्मपुरी असे म्हणत होते. तर, संत ज्ञानेश्वर यांच्या काळात येथे फक्त सहा वाड्या वस्त्या होत्या. त्यामुळे कालौघात सहा वाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असा एक तर्क मांडला जातो. याच सासवडमध्ये कऱ्हा नदी वाहते. सासवड ही संतभूमी असली तरी पराक्रमी योध्यांचीही ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया घातलेली ही तीच भूमी. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्लाही याच भूमीतला, स्वराज्यासाठी पहिली आहुती देणारे वीर बाजी पासलकर यांनी याच भूमीत आपला देह ठेवला. स्वराज्याचे निष्ठावंत सेवक पिलाजीराव जाधवराव, पानिपत संग्रमातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा अशा कितीतरी योद्ध्यांच्या पराक्रमामुळे पावन झालेले सासवड… याच सासवडमधील कऱ्हा नदीकाठी संगमेश्वर मंदिर आहे. या...