
नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी जायचं नसेल तर रसत्या शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोकं हे आजकाल गुगल मॅपचा वापर करतात. नवी मुंबईत देखील एका महिलेना याच गुगल मॅपचा वापर केला, पण त्यामुळे तिचा जीवच धोक्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुगल मॅपवर मार्ग पाहत उलवे दिशेने निघालेली एक कार थेट बेलापूर खाडीत कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. मात्र कार चालवत असलेल्या महिलेला सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत वाचवण्यात यश आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिला कारने उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपवर सरळ रस्ता दाखवला गेल्याने तिने पुलावर जाण्याऐवजी खालील मार्ग निवडला. मात्र, तो रस्ता थेट ध्रुवतारा जेट्टीकडे जात असल्याने तिची कार थेट खाडीत कोसळली.
जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ती महिला वाहून जात असताना बोटीच्या साहाय्याने सुखरूप वाचवलं. या अपघातस्थळी क्रेनच्या साहाय्याने कार देखील बाहेर काढण्यात आली . ही दुर्घटना थेट सागरी पोलिस चौकीसमोरच घडल्याने वेळेवर मदत मिळाली आणि महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळालं.
सागरी सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि शौर्य अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी गुगल मॅप वापरताना स्थानिक रस्त्यांची माहिती आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
बुलढाण्यात काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवले
बुलढाणा जिल्ह्यातून एक थरारक बातमी समोर आली आहे. काच नदीत अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकलेल्या चार शेतकऱ्यांना गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाले. रामेश्वर ढोले, अनिता ढोले, छायाबाई पायघन, आणि नम्रता पायघन अशी या वाचवलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दूरवर नदीक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अंदाज आला होता, त्यामुळे शेतातली कामे लवकर आटोपून ते ट्रॅक्टरने वेगाने घराकडे परतत होते.
मात्र, गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रातून असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. जसा ट्रॅक्टर नदीपात्रात उतरवला, तसा अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला आणि ट्रॅक्टरसह सर्वजण पुरात अडकले. यापैकी एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत तातडीने गावात फोन करून मदतीची याचना केली. घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोक तात्काळ धावून आले आणि त्यांनी अडकलेल्या चौघांना यशस्वीरित्या रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले. गावकऱ्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.