दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणारं हेच ते कुटुंब – गोपीचंद पडळकरांचा कोणावर निशाणा ?

गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांचा सिलसिला अद्यावपही कायम आहे,

दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन  जाणारं हेच ते कुटुंब - गोपीचंद पडळकरांचा कोणावर निशाणा  ?
गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 9:09 AM

सत्ताधारी आमदारांचा वाट्टेल ते बरळण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांचं थेट नाव न घेता त्यांच्या कुटुंबावर अतिशय खालच्या आणि गलिच्छ भाषेत टीका केली आहे. आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं सत्तेतील प्रमुख नेते तोंडी म्हणत असतात, तरी त्याच सत्ताधारी पक्षाचे आमदार राज्यातील प्रमुख नेत्यांनाही जुमानत नाहीत, त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही हेच चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे.

दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणारं ते कुटुंब असं म्हणतं गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबाचं नाव न घेता शेलक्या शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. सांगलीमधील ऋतुजा पाटील मृत्यूप्रकरणी पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता, तेथे भाषण करत असताना पडळकरांची मात्र जीभ घसरली.

काय बरळले पडळकर ?

संकष्टीचा दिवस असतो तेव्हा उपवास असतो, मात्र तेव्हा हे कुटुंब घरामध्ये मटण आणायचे. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. एका गटाची लोकं या मोर्च्यात पुढं पुढं करत आहेत, ते घर पण तसंच आहे. हे घरं असं की दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताना मटण खाऊन जातात, तुम्हाला सगळयांना माहीत आहे ते घर कोणतं आहे ! तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई कोणी आहे असं ते कॉकटेल घर आहे’ अशा अतिशय खालच्या भाषेत पडळकरांनी पवार कुटुंबांच नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

तुम्हाला हाता बेड्या ठोकून अटक केली होती – राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रत्युत्तर

गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ” भारतीय जनता पक्षाने अशी पाळीव माणसं पैशाने, पदाने कायमस्वरुपी आपल्या गोठ्यात बांधून ठेवलेली आहेत. ती माणसं कायम विरोधी पक्षातील नेत्यांवर भुंकत असतात, त्यापैकीच एक हे गोपीचंद पडळकर आहेत. पवार साहेब आणि तुमच्यात निश्चित फरक आहे, कारण तुम्हाला ( पडळकर) एखाद्या मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात, हातात बेड्या घालून पोलिसांनी तुम्हाला अटक केली होती. तेवढी लायकी किंवा पात्रता कोणत्याही राजकारण्याने किंवा आमदारने घालवलेली नाही. त्यामुळे आपला मागचा इतिहास लक्षात ठेवा आणि इथून पुढेतरी टीका करताना जरा तारतम्या बाळगा” असा इशारा जगताप यांनी दिला.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी या आधीही पवार कुटुंबीयांबद्दल बोलताना अनेकदा गलिच्छ भाषा वापरली आहे. त्यातच आता त्यांच्या या विधानाची पुन्हा भर पडली असून ते सत्ताधारी नेते, प्रमुखांनाही जुमानत नसल्याचे दिसत आहे.