
घरातील मोठ्या आणि छोट्या सुनेचाही अतोनात छळ करणाऱ्या, त्यांना क्रूरपणे मारहाण करणाऱ्या पुण्यातील मुळशी येथील हगवणे कुटुंबाचे हादरवणारे एकेक कारनामे समोर येत आहेत. वैष्णवी हगवणेचा पैशांसाठी छळ करणारे, तिला मारहाण करणारे, तिच्या मृत्यूस जबाबदार असलेले पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता यांना आधीच तर सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे दोघांना काल पोलिसांनी अटक केली. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात रोज नववे खुलासे होत असून त्यांच्या छळाला कंटाळूनच मोठी सून मयुरी जगताप हिने घर सोडलं होतं. सुनांना मारहाण करणारे,गुरासारखे राबवणाऱ्या हगवणेंचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे.
त्यांनी चक्क त्यांच्या बैलासाठी, नृत्यांदन गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. बैलाचा वाढदिवस हा फक्त बहाणा होता, पण पैशांचा बडेजाव मिरवण्यासाठी हगवणेंनी चक्क गौतमीची लावणी आयोजित केली . बैलासाठी त्यांनी पैशांची उधळपट्टी केली.
चक्क बावऱ्या बैलासमोर गौतमी पाटील लचकत, मुरडत नाचली
काही वर्षांपूर्वी गौतमी पाटील एका बैलासमोर नाचल्याची बातमी आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तारखेनुसार सांगायचं झालं तर एप्रिल 2023 साली मुळशीत गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम झाला. लचकत, मुरडत गौतमी चक्क एका बैलासमोर नाचली. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजतंय, त्याच हगवणे कुटुंबाने त्यांच्या बैलासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. हगवणे कुटुंबाच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसासाठी गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला होता. त्यावेळी स्टेजवर फक्त बैल उभा होता आणि समोर गौतमी पाटील नाचत होती. वैष्णवीचा दीर सुशील हगवणे युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी भला मोठा स्टेज बांधला होता. गौतमी जिथे नाचत होती, तिच्यामागे स्टेजवर सुशील राजेंद्र हगवणे यांचा मोठा फोटो आणि नावंही झळकलं होतं.
ज्या घरात सुनांना मारलं जातं, अमानुष मारहाण होते, हुंड्यासाठी छळ होतं, त्याच घरात बैलासाठी एवढी उधळपट्टी करून, लाखो रुपये खर्चून लावणीचा कार्यक्रम केला जातो. त्यातलं त्या बैलाल किती कळलं असेल हाही प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. त्यावेळचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच हगवणेंच्या सुनेच्या मृत्यूमुळे राज्यभरात संतापाचं वातावरण असून तिच्या 9 महिन्यांच्या मुलासाठी लोकांचा जीव हळहळतोय. सध्या त्याला त्याच्या आजी-आजोबांकडे, कस्पटे कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेलव्या हगवणे कुटुंबावर मकोका लावून कारवाई करावी अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे.