तब्बल 15 जण डिस्चार्जच्या वाटेवर, राजेश टोपेंची महाराष्ट्राला गुड न्यूज

राज्यातील 15 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

तब्बल 15 जण डिस्चार्जच्या वाटेवर, राजेश टोपेंची महाराष्ट्राला गुड न्यूज

मुंबई : राज्यातील 15 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. जगभरात कोरोना थैमान माजवत असताना राज्यातील 15 रुग्ण बरे होत आहेत ही एक समाधानाची बाब असल्याचं राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कोरोनापासून माणूस बरा होऊ शकतो. फक्त आपण काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केलं.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

“औरंगाबादमध्ये 1, मुंबईमध्ये 12, पुण्यात 2 अशा एकूण 15 जणांना डस्चार्ज दिला जाऊ शकतो. ही एक समाधानाची बाब आहे. यातून बरे होता येतं. आज 106 अॅडमिट आहेत. त्यातील 2 आयसीयूमध्ये आहेत. तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीबघून संचारबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढची परिस्थितीचा विचार करता मी काल जवळपास दोन ते तीन तास त्याबाबत अवलोकन केलं आहे. एन 95 चे मास्क, आयसोलेशनचे बेड, क्वारंटाईनचे बेड किती आहेत यासंदर्भात आढावा घेतला”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“अनेक कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून मदत करत आहेत. त्यांचं मी आभार मानतो. त्यांना आवाहनही करेल, अशा परिस्थितीत अशाच प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे,” असं राजेश टोपे म्हणाले.

‘नागरिकांनी नियम पाळावे’

“नागरिकांकडून अजूनही नियम पाळले जात नाहीत. भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डिस्टिंगचा नियम पाळला जात नाही. तो पाळला जावा. याशिवाय मी प्रशासनाला विनंती करेल की, लोकांना अत्यंत सोप्या पद्धतीने भाजी मिळेल, अशी व्यवस्था करावी”, असं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं.

“ग्रामीण भागात खूप मोठ्या संख्येने लोक आले आहेत. या लोकांना संशयाने बघू नका. आपले राज्य सुसंस्कृत राज्य आहे. त्यामुळे त्यांच्याशी माणुसकीने वागावे. त्यांच्यावर जरुर लक्ष ठेवावं. त्यांना तसे लक्षणे दिसली तर रुग्णालयात घेऊन जावे. मात्र, माणुसकी सोडू नये”, अशी विनंती राजेश टोपे यांनी केली.

‘धर्मगुरुंनी आरोग्यदूत म्हणून कोरोनाविषयी माहिती सांगावी’

“संचारबंदीदरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर अजूनही गर्दी असल्याचे चित्र दिसतं. विविध धर्माच्या धर्मगुरूंनी आरोग्यदूत म्हणून कोरोनाविषयी माहिती सांगावी, आपापल्या जाती धर्मातील बांधवांना योग्य मार्गदर्शन करावे”, असं आवाहन राजेश टोपेंनी केलं.

याशिवाय रुग्णालयांनी ओपीडी बंद करू नये, डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेऊ नयेत”, असं आवाहन राजेशे टोपे यांनी केलं. “गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, मात्र घरी थांबून कोरोनाला हरवू, असा संकल्प करा”, असं राजेश टोपे म्हणाले.

फिलिपाईन्सचा नागरिक कोरोना निगेटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (23 मार्च) फिलिपाईन्स नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तो रुग्ण कोरोनाबाधीत नव्हता, असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Published On - 4:02 pm, Tue, 24 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI