जळगावच्या तापी नदीवर असलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. आज उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगावमधील तापी नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे तापी नदीवर असलेल्या शेळगाव धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जळगावच्या तापी नदीवर असलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे तापी नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे शेळगाव बॅरेज प्रकल्पात पाण्याच्या साठ्यात वाढ झाली असून या धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत शेळगाव बॅरेजच्या उघडण्यात आलेल्या 12 दरवाजांमधून 1 लाख 20 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात हतनूर नंतर तापी नदीवर असलेलं शेळगाव बॅरेज हे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे..
हतनुर धरणाचे ही 24 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे त्यातून होत असलेल्या पाण्याचा विसर्ग त्यामुळे सुद्धा शेळगाव बॅरेज प्रकल्पात पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. शेळगाव बॅरेजच्या एकूण 18 दरवाजांपैकी सद्यस्थितीत 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने त्याआधी पावसाने ही हजेरी लावली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र, कोकणात ही पावसाची शक्यता आहे. ४ सप्टेंबरनंतर पावसाची तीव्रता कमी होणार आहे.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
पुणे, सातारा, अमरावती या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
